काही वाक्प्रचारांमध्ये व्यवहाराबरोबरच जगण्यातील मूल्यभावही वेगवेगळ्या पद्धतीने टिपलेला दिसतो. त्याची ही नमुनेदार उदाहरणे : 

१) ‘फुटकी कवडी जवळ नसणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, विपन्नावस्था/ दारिद्र्य असणे! कवडी म्हणजे समुद्रात आढळणाऱ्या एक प्रकारच्या गोगलगाईचे कवच. एके काळी  कवडी हे चलन म्हणून अस्तित्वात होते. फुटकी कवडी हे सर्वात कमी किमतीचे चलन होते. त्यानंतर कवडी, दमडी, पै, ढेला, पैसा, आणा व रुपया असा चलनाचा चढता क्रम होता. तीन फुटक्या कवड्या म्हणजे एक कवडी असे. त्यामुळे कवडीचुंबक असणे (कंजूष असणे), कवडीमोलाचा, कवडीची किंमत नसणे असे वाक्प्रचार रूढ आहेत . कवडीऐवजी कपर्दिक (मूळ संस्कृत शब्द कपर्दिका) हाही  शब्द काही वेळा आढळतो. ‘नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दाम’ या ग. दि. माडगूळकर यांच्या गाण्यात कवडीचा संदर्भ मार्मिकपणे टिपला आहे. आज कवडी हे चलन अस्तित्वात नसले तरी भाषेने, वाक्प्रचाराच्या माध्यमातून तिचे सांस्कृतिक मोल जणू जपून ठेवले आहे.

२) ‘गंगाजळी’ असणे म्हणजे श्रीशिल्लक असणे होय. गंगाजळी म्हणजे खर्च वजा जाता उरलेली रोकडी बचत, कायम शिलकीचा खजिना! गंगा नदीला पुराणकथा, विविध भाषांमधल्या अनेक साहित्यकृती  यांच्यामुळे एक प्रकारचे सांस्कृतिक वलय प्राप्त झाले आहे. त्यामुळे ‘वाहिली ती गंगा आणि राहिले ते तीर्थ’, ‘वाहिले ते  पाणी आणि राहिले ते गंगाजळ’ अशा लोकोक्ती रूढ आहेत. जे उरले ते पवित्र आहे, मोलाचे आहे, असा त्याचा भावार्थ आहे. कवी र्गोंवदाग्रजांनी आपल्या कवितासंग्रहात म्हटले आहे ‘जे जे ज्या समयी मनात भरले, स्वच्छंद नाना स्थळी/ ते ते त्या समयी जपून धरता, ही होय गंगाजळी’! तसेच व्यासंगी ग्रंथपाल श्री. बा.  जोशी यांनी आपल्या मराठी, बंगाली, हिंदी, गुजराती, संस्कृत, इंग्लिश  अशा   विविध  भाषांच्या अफाट वाचनातून निवडक टिपणे संकलित केली आहेत, त्या पुस्तकाचे शीर्षक ‘गंगाजळी’ असे अगदी अर्थपूर्ण ठेवले आहे!

– डॉ. नीलिमा गुंडी