खेळातील ऑलिम्पिक स्पर्धा खूप चुरशीची असते, तसेच गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये असते. त्यामुळे प्रशिक्षण खूप महत्त्वाचे आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर पात्रता स्पर्धा घेऊन संघ निवडण्यात येतो. भारतात ऑलिम्पियाडचे प्रशिक्षण कसे दिले जाते, संघाची निवड कशी होते, याविषयी पाहू. ऑलिम्पियाडला पाठवण्यात येणाऱ्या सहा विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया अनेक पायऱ्यांमधे विभागली गेली आहे. संपूर्ण देशाचे २८ विभाग पाडले आहेत. या २८ विभागांचे समन्वयक तसेच राष्ट्रीय समन्वयक, उपसमन्वयक स्पर्धेसाठीच्या प्रक्रियेत सहभागी असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिली पायरी म्हणजे ऑगस्टमध्ये देशभरात घेतली जाणारी, तीन तासांची, वस्तुनिष्ठ स्वरूपाची पूर्व-विभागीय परीक्षा. तिला आठवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी/विद्यार्थिनी बसू शकतात. या परीक्षेतील गुणांवरून निवडलेल्या प्रत्येक विभागातील सुमारे ३५० विद्यार्थ्यांना ऑक्टोबरमध्ये विभागीय परीक्षेला बसता येते. विभागीय परीक्षेच्या निकालाच्या आधारे प्रत्येक विभागातील सुमारे ३० विद्यार्थ्यांंना पुढच्या भारतीय राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षेला (आयएनएमओ) बसता येते. ही चार तासांची परीक्षा जानेवारीत असते. या परीक्षेत देशभरातून पहिल्या आलेल्या सुमारे ३५ मुलांना आयएनएमओ पारितोषिक विजेते म्हटले जाते. त्यांना त्या त्या विभागाकडून बक्षिसे तसेच काही प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये पुढील शिक्षणासाठी थेट प्रवेश इत्यादी सन्मान मिळतात. आयएनएमओ पारितोषिक विजेत्यांचा चार आठवडय़ांचा प्रशिक्षण वर्ग एप्रिल-मे मध्ये मुंबईतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात होतो. यात देशभरातील अनेक गणितज्ञ वर्ग घेतात आणि मार्गदर्शन करतात. मागील वर्षांतील  आयएनएमओ विजेत्यांनाही, त्यांनी अजून बारावी पूर्ण केली नसेल तर, या वर्गात भाग घेता येतो. प्रशिक्षणाबरोबरच वर्गात एकूण चार परीक्षा घेतल्या जातात आणि त्यातील कामगिरीवरून सहा जणांचा संघ निवडला जातो. कोविड-१९ च्या काळात या पद्धतीत काही बदल झाले. या सर्व प्रक्रियेसंबंधी अधिक माहिती होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आपल्या पाल्याला लवकरात लवकर गणित ऑलिम्पियाडचे मार्गदर्शन मिळावे अशी अनेक पालकांची इच्छा असते. मात्र त्यांनी संयम बाळगला पाहिजे. साधारणपणे आठवी-नववीच्या आधी असे शिक्षण सुरू करणे सयुक्तिक नाही. ही स्पर्धा हुशारातल्या हुशार मुलांसाठी आहे. प्रश्न कठीण असतात.  दीर्घकालीन प्रशिक्षण, सराव याशिवाय अशा प्रश्नांना हात घालणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे स्पर्धेची तयारी आठवी/नववीपासूनच सुरू केली, तरीही ११वी, १२वीच्या आधी साधारण हुशार मुलांचाही त्यात निभाव लागणे कठीण आहे. स्पर्धेबरोबरच ऑलिम्पियाड प्रश्नांचा स्वत: आनंद घेणे हा उद्देश ठेवला पाहिजे.  

– डॉ. रवींद्र बापट

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparation for math olympiad zws
First published on: 13-10-2021 at 01:18 IST