ग्रह-तारे, चंद्र-सूर्य यांची आकाशातली स्थाने ढोबळमानाने दर्शवण्यासाठी विविध तारकासमूहांचा, नक्षत्रांचा आधार घेतला जातो. या वस्तू आकाशात अचूकपणे दर्शवण्यासाठी मात्र संदर्भ पद्धतींचा वापर करावा लागतो. सर्वसाधारण आलेखाप्रमाणेच आकाशातल्या वस्तू दर्शवण्यासाठीही दोन संदर्भांची आवश्यकता असते. आकाशस्थ वस्तूची, या दोन संदर्भांपासूनची आकाशाच्या गोलावरची अंतरे ही त्या वस्तूचे संदर्भांक असतात. आकाशस्थ वस्तूंची स्थाने दर्शवण्यासाठी गरजेनुसार वेगवेगळ्या संदर्भ पद्धती वापरल्या जातात. त्यापैकी स्थानिक संदर्भ पद्धतीत, निरीक्षणाच्या ठिकाणचे क्षितिज हे संदर्भवर्तुळ म्हणून आणि या क्षितिजावरचा उत्तरबिंदू हा संदर्भबिंदू म्हणून वापरला जातो. या पद्धतीनुसार, आकाशस्थ वस्तू उन्नतांश आणि क्षित्यंश या दोन संदर्भांकांनी दर्शवली जाते. उन्नतांश म्हणजे आकाशस्थ वस्तूचे आकाशाच्या गोलावरचे, क्षितिजापासूनचे अंतर आणि क्षित्यंश म्हणजे त्या वस्तूचे क्षितिजालगत मोजलेले उत्तरबिंदूपासूनचे अंतर. ही दोन्ही अंतरे अंशांच्या स्वरूपात दिली जातात.

एखाद्या ताऱ्याचे उन्नतांश मोजायचे असल्यास, त्या ताऱ्यापासून क्षितिजापर्यंत आकाशाच्या गोलावर लंब टाकायचा. आपला एक हात त्या ताऱ्याकडे रोखायचा आणि दुसरा हात लंब क्षितिजाशी जिथे मिळतो त्या बिंदूकडे रोखायचा. आपल्या दोन हातांमध्ये होणारा कोन म्हणजे त्या ताऱ्याचे उन्नतांश. या पद्धतीनुसार, क्षितिजावरील सर्व ताऱ्यांचे उन्नतांश हे शून्य अंश असतात, तर बरोबर डोक्यावरील ताऱ्याचे उन्नतांश नव्वद अंश असतात. आकाशात दिसत असलेल्या इतर सर्व ताऱ्यांचे उन्नतांश शून्य ते नव्वद अंश या दरम्यान भरतात. क्षितिजाखाली असणाऱ्या ताऱ्याचे उन्नतांश ऋण चिन्हाने दर्शवले जातात.

क्षित्यंश मोजण्यासाठी, आपला डावा हात क्षितिजावरील उत्तरबिंदूकडे रोखायचा. उजवा हात हा, ताऱ्याकडून टाकलेला लंब क्षितिजावरील ज्या बिंदूवर मिळतो, त्या बिंदूकडे रोखायचा. आता या दोन हातांतला कोन म्हणजे त्या ताऱ्याचे क्षित्यंश. क्षित्यंश हे घडय़ाळाचे काटे ज्या दिशेने फिरतात, त्या दिशेने म्हणजे उत्तरेकडून पूर्वेकडे मोजायचे. या पद्धतीनुसार उत्तरबिंदूचे क्षित्यंश शून्य भरतात, तर पूर्वबिंदू, दक्षिणबिंदू आणि पश्चिमबिंदू यांचे क्षित्यंश अनुक्रमे ९०, १८० आणि २७० अंश भरतात. सर्व आकाशस्थ वस्तूंचे क्षित्यंश, त्यांच्यापासून टाकलेला लंब क्षितिजावर ज्या बिंदूशी पडेल, त्यानुसार ० अंश ते ३६० अंशांदरम्यान असतात.

या पद्धतीने एखादी आकाशस्थ वस्तू, निरीक्षणाच्या ठिकाणी आणि ठरावीक वेळेला प्रत्यक्ष कुठे दिसेल, ते सहज समजू शकते. मात्र क्षितिजाचे वर्तुळ हा स्थानिक संदर्भ आहे. तसेच वस्तूचे स्थानही क्षितिजाच्या संदर्भात सतत बदलत असते. म्हणून या पद्धतीनुसार आकाशस्थ वस्तूचे संदर्भांक सांगताना, निरीक्षणाचे स्थान आणि निरीक्षणाची वेळही सांगावी लागते. त्यामुळे स्थानिक संदर्भ पद्धत ही सापेक्ष स्वरूपाची संदर्भ पद्धत ठरते.

– डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org