scorecardresearch

कुतूहल – पीक संरक्षणाची गरज

पिकांच्या नुकसानीला कारणीभूत असणाऱ्या मुख्य घटकांमध्ये किडी, उंदीर, रोगराई, तणे, साठवणूक आणि इतर घटक असले तरी सर्वसाधारणपणे ही आकडेवारी १०-३० टक्के आहे.

पिकांच्या नुकसानीला कारणीभूत असणाऱ्या मुख्य घटकांमध्ये किडी, उंदीर, रोगराई, तणे, साठवणूक आणि इतर घटक असले तरी सर्वसाधारणपणे ही आकडेवारी १०-३० टक्के आहे. या नुकसानीमुळे दरवर्षी दोन-तीन लाख कोटी रुपये देशाला गमवावे लागतात. हे नुकसान होऊ नये आणि मालाची प्रत बिघडू नये, यासाठी पिकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
पीक संरक्षणाची गरज ठरवण्यासाठी काही ठरावीक पद्धतींची शिफारस आहे. यामध्ये सर्वेक्षणानुसार अंदाज करण्याची पद्धत सोपी असून सगळ्या पिकांसाठी वापरता येते. यासाठी शेतात तिरप्या किंवा नागमोडी पद्धतीने चालत जाऊन एक हेक्टर जागेतील कमीत कमी २०० झाडांचे निरीक्षण करतात. शेत मोठे असल्यास शेताचे पाच भाग (चार कोपऱ्यांत आणि एक मध्यभागी) करून इजा झालेल्या झाडांची टक्केवारी काढतात. साधारणपणे १०-२० टक्के झाडांवर किडी किंवा रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास योग्य पीक संरक्षणाच्या उपायांचा अवलंब करतात.            
 दुसऱ्या पद्धतीत शेतातील ५०-७५ झाडे प्रति हेक्टर रॅण्डम पद्धतीने निवडून त्यावरील किडींची संख्या मोजतात. उदा. कपाशीवरील मध्यभागातील तीन पानांवरील तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी यांची संख्या निश्चित करतात. त्यानुसार रासायनिक कीडनाशकांचा उपयोग करतात.
तिसऱ्या पद्धतीत लंगिक सापळ्यांचा (फेरोमोन ट्रॅप- सोबतचे छायाचित्र पाहा.) उपयोग करतात. यामध्ये कृत्रिम रासायनिक संयुगे वापरतात. त्यामुळे नर किडे आकर्षति होतात आणि सापळ्यात अडकतात. प्रत्येक किडीसाठी वेगवेगळ्या विशिष्ट रसायनांची संयुगे असतात. एक हेक्टर जागेत १० ते ५० सापळे लावतात. कपाशीच्या बोंडअळीचे आठ-दहा पतंग प्रति सापळ्यात सतत दोन-तीन दिवस सापडले तर लगेच पीक संरक्षणाची उपाययोजना अवलंबली जाते. रोगाची तीव्रता १-१० किंवा १-१५ या स्केलवर मोजली जाते. यासाठी रोगराईमुळे पाने किंवा फळे किती प्रमाणात खराब झाली, याचे निरीक्षण केले जाते.
याप्रमाणे रोग आणि किडीचे योग्य निरीक्षण करून किडी किंवा रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीची कल्पना येते आणि पीक संरक्षणाची गरज आहे की नाही हे ठरवता येते.
– डॉ. रूपराव गहूकर (नागपूर) मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – माझ्या समाजाचे बदलते स्वरूप
मी गरीबकधीच नव्हतो. शिवाय जातीने ब्राह्मण, त्यामुळे भारतातल्या दोन मूलभूत अडचणी जन्मत:च पार पडल्या. नाही म्हणायला मुंबईच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात काम करताना जगातल्या सर्वात मोठय़ा झोपडपट्टीमधल्या अज्ञान आणि गरिबीचा स्पर्श झाला आणि ओळख पटली; परंतु उपेक्षा आणि गरिबी अनुभवल्याची आठवण नाही.
गेल्या १५-२० वर्षांत माझ्या समाजातल्या श्रीमंतीचा देखावा आणि स्पर्श जाणवत आहे. निरनिराळ्या Club  ची मेंबरशिप. व्यायामासाठी Golf   खेळणे. त्यासाठी अनेक मैल गाडीने प्रवास करणे. पैसे वाचविण्यासाठी गाडी डिझेलची असणे. एकाला मी म्हटले तुझी गाडी माझ्या  Bed Room  एवढी आहे, तेव्हा तो म्हणाला Golf खेळायला जाताना अशा गाडय़ा नेण्याची पद्धत आहे.
दर घरटी दोन किंवा तीन गाडय़ा किमान असतात. प्रत्येक गाडीला ड्रायव्हर असतो. समारंभाच्या ठिकाणी गाडय़ा ठेवायची मारामार. म्हणून शेकडो मीटर्सवर गाडी ठेवावी लागते. तेव्हा ड्रायव्हरला मोबाइल फोन द्यावा लागतो. नवरा-बायको आणि तीन ड्रायव्हर मिळून एकूण पाच मोबाइल फोन.
मुलं अमेरिकेला. त्याचे दर्शन स्काइपवर होते. Hi  आई Hi   डॅड. हल्ली लोकांना एसीशिवाय झोप लागत नाही आणि परफ्युमशिवाय बाहेर पडता येत नाही. काहींना व्यायामाला वेळ नाही आणि वेळ असेल तर कंटाळा येतो म्हणून घरी  Personal Trainers  येतात.
दर आठवडय़ाला दोन पाटर्य़ा असतात. साखरपुडय़ासारख्या कार्यक्रमातही हजार लोक हजेरी लावतात. उभं राहायला जागा नसते.जेवायच्या आधी खाण्याचे पदार्थ फिरवतात, त्यातच हजार कॅलरीज संपतात.
 दोन माणसांतला संवाद ऐकू येणार नाही इतके कर्कश संगीत असते.  एक दुसरीला म्हणते ‘अगं केसाचं काय केलं आहेस? छान दिसतात’ तेव्हा दुसरी म्हणते ‘तुझं वजन कमी झालंय का गं?’ तेव्हा ती उत्तरते ‘याला ’Cholesterol निघाले आहे. तेल-तूप अंडय़ातले पिवळे सगळे बंद करावे लागले. त्यात माझाही फायदा झाला. खूप  Fresh  वाटते. पण काय उपयोग, रात्री हा इतका दमून येतो!’ पुरुषांच्या संवादात कोणी कुठे जमीन घेतली, कुठली इम्पोर्टेड गाडी बेस्ट आणि एक-दोन  Extra Flats   घेऊन ठेवण्याजोगी Investment  नाही, अशी वाक्ये असतात.
या पार्टीजना जो सर्वात उशिरा येतो तो जास्त यशस्वी, अशी व्याख्या असते. मी लौकिकदृष्टय़ा तऱ्हेवाईक आणि अयशस्वी असल्यामुळे मी कधी एकदा पळतो आणि काहीतरी निराळेच वाचायला घेतो, असे विचार येतात. त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – हृद्रोग व मानसिक ताणतणाव
हृद्रोग संबंधित तक्रारींना; मानसिक ताणतणावाची जोड मिळाली की त्या व्यक्तीचे काही खरे नसते. ‘आपण’ सर्वानीच आपले जीवन अत्यंत ‘फास्ट’ केले आहे. कोणीच ‘थांबायला’ तयार नाही. ‘ज्याला त्याला रेसमधला एक नंबरचा घोडा व्हायचे आहे’  तुम्ही आम्ही आपल्या ताकदीच्या बाहेर कामे घेऊन बसतो; स्वत:वरच्या जबाबदाऱ्या वाढवतो. सायकलऐवजी वेगवान मोटारसायकल, त्यानंतर स्वत:च्या कारचे स्वप्न पाहतो. अशा तणावपूर्ण जीवनशैलीमुळे घरात, धंदे-उद्योगात, ऑफिसच्या कार्यालयात सतत तणावग्रस्त, चिंताग्रस्त वातावरण असते. क्षुल्लक कारणाने भांडणतंटे होत असतात. रात्रीच्या झोपेचे ‘खोबरे’ होते.
हृद्रोगी व्यक्तीला थोडय़ाशाही श्रमाने; अधिक बोलण्याने, जिने चढ-उतार करण्याने छातीवर प्रेशर येते किंवा दमायला होते. असे कळल्याबरोबर त्याने जागे व्हायलाच हवे. अशा व्यक्तीने एक दिवस निवांतपणे आपल्या दैनंदिन जीवनक्रमाचा आपल्या वाढत्या जबाबदारींचा; मर्यादित साधनसंपत्तीचा आढावा घ्यावा. टाळता येण्यासारख्या जबाबदाऱ्या कमी कराव्यात. हृद्रोग व मानसिक ताणतणाव असताना आयुर्वेदातील पुढील बोधवचन सतत डोळ्यासमोर ठेवावे. कटाक्षाने तसे वागावे.
थोर आयुर्वेदीय शास्त्रकार असे सांगतात की, आपले शारीरिक स्वास्थ्य, केवळ शरीर तंदुरुस्त ठेवून भागत नाही. आपल्या कर्मेद्रिय व ज्ञानोंद्रियांना आपण सतत प्रसन्न ठेवलेच पाहिजे. पण त्याहीपेक्षा आपल्या मनाला व आत्म्याला प्रसन्न ठेवण्याची नितांत गरज आहे. या कार्यात ब्राह्मी, वेखंड, जटामांसी या मायभगिनींचे, सुवर्णमाक्षिक भस्माचे योगदान मोठेच आहे. सुवर्णमाक्षिकादिवटी, शृंग, लाक्षादि, गोक्षुरादि, अभ्रकमिश्रण यांच्या जोडीला ब्राह्मीवटी व लघुसूतशेखरची मदत घ्यावी. भोजनोत्तर अर्जुनारिष्ट, झोपताना निद्राकरवटी, नाकात एक वेळ अणुतेल कटाक्षाने टाकावे. झोपण्यापूर्वी कानशिले, कपाळ, तळहात तळपायांना शतधौतघृत जिरवावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – १९ नोव्हेंबर
१८७५> इतिहाससंशोधक, पुरातत्त्वशास्त्रज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा जन्म. प्राच्यविद्यापंडित रा. गो. भांडारकर यांच्या या सुपुत्राने पंचम जॉर्जसाठी १९११ साली घारापुरी बेटाची मार्गदर्शिका लिहिली होती. पुढे त्यांनी विदिशाजवळ केलेले मौर्यकालीन उत्खनन महत्त्वाचे ठरले. प्राचीन बांधकामे, नाणेशास्त्र, राजकारण यांचा विशेष अभ्यास त्यांनी केला होता. ‘हिंदु लोकसमाजाती परदेशीय अंश’ हा त्यांचा मराठी दीर्घलेखही महत्त्वाचा आहे.
१८९७> ‘हाल सातवाहनाची गाथासप्तशती’ या ग्रंथासह अनेक पुस्तकांचे कर्ते, चतुरस्र लेखक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचा जन्म. ‘सह्याद्री’, ‘सिंहासन बत्तिशी’, ‘स्वातंत्र्याची मूलतत्त्वे’ अशा विविध विषयांवरील पुस्तके त्यांनी लिहिली होती.
१९१२> विश्वनाथ वामन पत्की यांचा जन्म. दहा कादंबऱ्या, तीन कथासंग्रह, फडके यांच्या साहित्याचा समीक्षाग्रंथ, तसेच न्या. एम. सी. छागला (शिशिरातील गुलाब) आणि सी. डी. देशमुख (माझा जीवनप्रवाह) या आत्मचरित्रांचे अनुवाद त्यांनी केले होते. १९९२ साली त्यांचे निधन झाले.
१९६३ > ‘पेशवेकालीन महाराष्ट्र’, ‘खरा देशभक्त’ आदी पुस्तकांचे लेखक वासुदेव कृष्ण भावे यांचे निधन.
– संजय वझरेकर

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.