देशातील कृषि, आरोग्य, गृहनिर्माण, शिक्षण, जल-व्यवस्थापन, संरक्षण, यांसह अनेक क्षेत्रांच्या आर्थिक-सामाजिक विकासासाठी विविध स्तरावर नियोजन करावे लागते. त्यासाठी आकडेवारीवरून सद्यस्थितीचे आकलन आणि भविष्यातील स्थितीचे पूर्वानुमान संख्याशास्त्र देते. भारतात अशी आकडेवारी ‘राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था’ (एनएसएसओ) संकलित करते. संख्याशास्त्राच्या पद्धतीने निवडलेल्या प्रातिनिधिक घरांना भेटी देऊन ती आकडेवारी गोळा केली जाते. भारत देश, राज्य आणि स्थानिक पातळीवर चालणाऱ्या अशा संख्याशास्त्रीय कार्यक्रमांचा पाठपुरावा ‘मध्यवर्ती सांख्यिकी संस्था’ प्रत्येक राज्यातील आर्थिक आणि सांख्यिकी संचालनालयाच्या मदतीने करते.

उदा.-शाळाबा मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी या शाळाबा मुलांची टक्केवारी काढणे कळीचे आहे. २०११ची जनगणना आणि एनएसएसओच्या २०१४ च्या (७१व्या फेरीतील) सर्वेक्षण अहवालानुसार, भारताच्या पश्चिम विभागातील १.१७ टक्के मुलं तर महाराष्ट्रातील ०.८१ टक्के   मुलं शाळाबा आढळली. त्यामागची कारणे मुलांचे लिंग, इयत्ता, जात, आईचा व्यवसाय,  शाळेतील सर्वोच्च इयत्ता, घर ते शाळा अंतर, स्त्री-शिक्षकाची उपलब्धता या  घटकांवर अवलंबून असल्याचे, एक सांख्यिकी विश्लेषण सांगते. या आधारे शाळाबा मुलांची संख्या कमी करण्याचे उपाय आखले जात आहेत. करोना साथीच्या संदर्भात रोजची आकडेवारी लक्षात घेऊन लोकांच्या संरक्षणासाठीचे संख्याशास्त्रीय नियोजन चालू आहे. संख्याशास्त्रीय विश्लेषणातून भारतातल्या शुश्रूषालयांतील उपलब्ध आरोग्य सुविधांचे पूर्वानुमान, कोणतीही काळजी न घेतल्यास करोनाची रोगकता, प्रत्येक दिवसातली बाधितांची संख्या, कोणत्या वैद्यकीय सेवा किती प्रमाणात लागतील, यांचे अंदाज मिळवले जातात. त्यातूनच परिणामकारक, स्वस्त, सुरक्षित उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. विविध देशांतील शेतकी उत्पादनांची आकडेवारी पद्धतशीर नमुना सर्वेक्षणाद्वारे संकलित करून,त्यांचे संख्याशास्त्रीय आकलन मिळवले जाते. अन्नोत्पादनांच्या माहितीचा उपयोग राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील अन्न आणि पोषण सुरक्षेचे नियोजन करण्यासाठी होतो. अशीच माहिती गरिबी/भूक, स्त्रियांचे सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण इत्यादींच्या नियोजनासाठी वापरतात. तसेच कृषि, रेल्वे, विमा, बँकिंग आणि अन्य  क्षेत्रांसाठी आकडेवारी गोळा करणाऱ्या स्वतंत्र व्यवस्था आहेत. या संस्था माहिती संकलित करून तिच्यावर संख्याशास्त्रीय विश्लेषण करून नियोजनासाठी उपयुक्त अहवाल प्रसिद्ध करतात.

‘युनेस्को इन्स्टिटय़ूट फॉर स्टॅटिस्टिक्स’, ‘जागतिक आरोग्य संघटना’ या आंतरराष्ट्रीय संस्था अशा माहितीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करून जागतिक कल्याणासाठीनियोजनाचे मार्ग सुचवितात

– डॉ. विद्या वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org