रुक्मिणीबाई धार्मिक असल्या तरी त्यांना समकालीन राजकीय घडामोडींची जाणीव होती. जेमतेम अक्षरओळख होती तरी केसरी आणि शाळेत जाणारी मुले यांच्या माध्यमातून त्या राष्ट्रीय चळवळीची माहिती घेत असत. शिवाजीराव भावे लिखित विनोबा चरित्रात रुक्मिणीबाईंची राजकीय समज नेमकी आली आहे. (पुढील अवतरणातले जुन्या वळणाचे, अनुच्चारित अनुस्वारयुक्त शुद्धलेखन मूळ उताऱ्याबरहुकूम)  ‘‘माधवराव रानडे, केरुनाना छत्रे, कुंटे, भांडारकर, यांच्या ती गोष्टी सांगे. काँग्रेसची तिला चांगली माहिती असे. दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बानर्जी, अरिवद घोष, ‘लाल-बाल-पाल’ ही जहाल त्रिमूर्ति, ‘गोखले-वाच्छा-मेथा’ ही मवाळ त्रिमूर्ति—त्या सर्वाविषयीं तिला अतिशय आदर वाटें. आपल्या मायभूमीला मुक्त करण्यासाठीं धडपडणाऱ्या त्या पुढाऱ्यांप्रमाणेंच सावरकर, खुदिराम बोस यांच्या धाडशी कृत्याकडेहि ती अभिमानानें पाही. त्यासंबंधीं गोष्टी निघत. विवेकानंदांचा वेदान्तदिग्विजय, रामतीर्थाचें हिमालय पर्यटन ह्यासंबंधी तिला किती कौतुक वाटे! शिवाजीचें केळुसकरांचें चरित्र, बापटांचें, बाजिरावाचें चरित्र, विवेकानंद, टिळक, रामतीर्थ, झांशीची राणी, अहिल्याबाई, रामकृष्ण परमहंस—अनेकांचीं चरित्रें तिनें वाचून घेतलीं होतीं. देशाची सेवा केली म्हणजे देवाची सेवा झालीच’, अशी तिची समजूत होती.’’

 विनोबांच्या अध्ययनावरही आईचा प्रभाव दिसतो. त्या काळातील उच्चवर्णीय म्हटल्या जाणाऱ्या घरातील स्त्रियांच्या अभ्यासाची ही रीत होती. रुक्मिणीबाईंचा विशेष असा की, त्यांनी आपल्या मुलांपर्यंत हे संस्कार पोहोचवले आणि मुलांनीही ते घेतले. त्यांचे प्रखर वैराग्य विनोबांकडे आले. बाळकोबांनी त्यांची संगीत कला घेतली तर सर्व कुटुंबीयांना सामावून घेण्याची वृत्ती शिवबांकडे आली. त्यांच्यातील सेवा आणि समर्पणाचा भाव तर तिन्ही मुलांमध्ये ओतप्रोत होता.

रुक्मिणीबाई वृत्तीने विरक्त होत्या. ‘विन्या तू वैराग्याचे नाटक तर खूप करतोस पण मी जर स्त्री नसते तर खरे वैराग्य म्हणजे काय हे तुला दाखवले असते.’  या आशयाचे त्यांचे उद्गार सूचक आहेत. त्यामुळेच विनोबांचा गृहत्याग त्यांना खटकला नाही. असे असले तरी त्यांनी प्रापंचिक कर्तव्यांची उपेक्षा केली नाही. त्या फ्ल्यूच्या राक्षसी संकटात सापडल्या, तेव्हा विनोबा आश्रमात होते. गांधीजींनी त्यांना घरी पाठवले. अंथरुणावर खिळलेल्या रुक्मिणीबाईंच्या सेवेत पती व तिन्ही मुले असूनही त्यांची जीवनेच्छाच संपली होती. २४ ऑक्टोबर, १९१८ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

त्यांच्यावर धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करायचे नाहीत असे विनोबांनी स्पष्टपणे बजावले. लोकात राहायचे म्हणून नरहरपंतांनी विनोबांचे म्हणणे ऐकले नाही. आईचे अंत्यसंस्कार करून परत आलेल्या भावंडांना त्यांनी, काही घडले नाही असे समजून घरात वावरायला सांगितले.

शिवाजीराव भावे यांनी काढलेले रुक्मिणीबाईंचे एक रेखाचित्र आहे. त्या चित्रात आपली आई एखाद्या योगिनीप्रमाणे दाखवली आहे. ‘आमची आई तुकाराम होती आणि वडील रामदास, कारण ते अनुक्रमे ४२ आणि ७२ वर्षे जगले,’ असे विनोबांनी एकदा म्हटले होते. आता आई वडिलांचे वय हे काही त्यांच्या महतीचे कारण होऊ शकत नाही. हेच विनोबा तुकोबांना मातृवत् मानत हे लक्षात घेतले की रुक्मिणीबाईंचा अधिकार लक्षात येतो.

– अतुल सुलाखे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

  jayjagat24 @gmail.com