पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि त्याचे फटके आपल्याला बसत आहेत. तापमानवृद्धीचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे हिमनद्या वितळणे. पृथ्वीवरील गोडय़ा पाण्याचा ६९ टक्के भाग साठवून ठेवणाऱ्या या हिमनद्या म्हणजे पृथ्वीवरची काही लाख वर्षांची श्वेतसंपदा आहे. ती तशीच राहाणे आवश्यक आहे. या हिमनद्यांमध्ये असलेले सूक्ष्म जीव तर पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेतच, शिवाय पृथ्वीचे सूर्यापासून रक्षण करण्याची या नद्यांची क्षमताही अनन्यसाधारण आहे. मात्र गेल्या काही वर्षांत जगातील जवळपास सर्वच हिमनद्यांचे स्वरूप बदलत गेले आहे.

हिमनद्यांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश आपल्या श्वेतकांतीवरून परावर्तित करणे. या परावर्तनामुळे पृथ्वीचे तापमान मर्यादित राहते. हिमनद्या जसजशा आक्रसत आहेत, तसतसा सूर्याचा अधिकाधिक प्रकाश पृथ्वी शोषून घेत आहे आणि त्यातून पृथ्वीचे तापमान वाढत आहे. विज्ञानाच्या माध्यमातून हे चक्र उलटे फिरवण्याचा एक प्रयत्न इटलीत करण्यात आला. हिमनद्यांवर पांघरूण घालण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो बऱ्यापैकी यशस्वीही झाला आहे. हे पांघरूण ‘जिओटेक्सटाईल’चे आहे. याचा मुख्य गुणधर्म म्हणजे मातीला किंवा इतर पदार्थाना धरून राहणे. या जिओटेक्सटाईलचा मूळ घटक असतो पॉलिएस्टर किंवा पॉलिप्रोपोलीन.

ही मोहीम इटलीतील क्रिस्टीयानो क्यासारोटो यांच्यामुळे सुरू झाली. त्यांची निम्मी हयात हिमनद्यांच्या अभ्यासात गेली आहे. ते म्हणतात, ‘हिमनद्या आक्रसताना, त्यांनी पोटात दडवलेली गुपिते उघडय़ावर पडताना मी अनुभवली आहेत.’ हिमनद्यांच्या वरच्या थरांचे वितळणे आणि दरवर्षी होणारा नवा हिमसंचय यांचा समतोल बिघडला की हिमनद्या आपला पसारा आवरू लागतात. यावर उपाय म्हणून हिमकडय़ांना किंवा बर्फाच्या उतारांना बांधून ठेवणारे ‘कापड’ वापरण्याची कल्पना त्यांनी मांडली.

ते अभ्यास करत असलेल्या सातपैकी काही हिमनद्यांचा ठरावीक भाग आच्छादित करण्यात आला. कापडाने हिम पकडून ठेवण्यासाठी आणि स्वत: घरंगळू नये, यासाठी त्यात वाळू भरण्याचेही प्रयोग झाले. आच्छादनाने हिमनद्यांची आधीपेक्षा ६९ टक्के कमी क्षती होते, असे शास्त्रीय निरीक्षण सांगते. ही आच्छादने प्रामुख्याने सूर्याचा प्रखर प्रकाश स्वत: झेलतात आणि त्याची झळ हिमनद्यांना लागू देत नाहीत. तसेच प्रकाश परावर्तित करण्याची हिमनद्यांची क्षमता जवळपास ५० टक्क्यांनी वाढवतात. स्वाभाविकच, हिमनद्यांचा आच्छादने असलेला भाग आणि आच्छादने नसलेला भाग यांच्या उंचीत काही ठिकाणी पाच मीटरचा फरक पडला आहे. निसर्ग आणि विज्ञान यांचे एकत्रित असणे किती महत्त्वाचे आहे, हे या प्रयोगातून स्पष्ट होते.

– दिलीप ना. वंडलकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org