जमिनीवरच्या जंगलात आढळणारे काजवे हे आपल्या माहितीतील जीवदीप्तीकारक कीटक आहेत. तसेच समुद्रातील अनेक प्राण्यांपैकी आणि काही वनस्पतींपैकी अनेक सजीव जीवदीप्तीधारक आहेत, ज्यांच्या शरीरात बायोल्युमिनिसन्सची प्रक्रिया  होते. म्हणजेच त्यांना जीवदीप्ती निर्माण करता येते.

जीवदीप्तीकारक जिवाणू सागरात एकएकटे, मुक्तपणे राहतात किंवा काही प्राण्यांच्या शरीरात त्यांची वस्ती असते. असे सहजीवन आंतरगुही, कृमी, मृदुकाय, कंटकीचर्मी, मासे आणि जिवाणूंमध्ये आढळते. ‘अ‍ॅलिव्हिब्रिओ फिश्चेरी’ जिवाणू माकूळ या प्राण्याच्या शरीरात वस्तीला असतो. या जिवाणूला आयते खायला मिळते. संरक्षण मिळते. माकुळाला या बदल्यात काय मिळते? जिवाणूने निर्माण केलेल्या प्रकाशामुळे सहचराला किंवा भक्ष्याला आकर्षित करता येते. जिवाणूला आणखी एक फायदा होतो. माकुळाला दिवसा जीवदीप्तीप्रकाशाची गरज नसते. तो बरेचसे जिवाणू शरीराबाहेर टाकतो. ते दुसऱ्या माकुळाच्या शरीरात शिरतात. तिथे वस्ती करतात. त्यांचा प्रसार होतो! ‘फोटोबॅक्टेरियम’ जातीचे जिवाणू मासे आणि मृदुकाय प्राण्यांच्या शरीरात राहतात. दोघांनाही फायदा! ‘फोटोबॅक्टेरियम फॉस्फोरियम’ जिवाणू प्रयोगशाळेत शंकूपात्रात वाढवले तर त्यांची जीवदीप्ती फार सुंदर दिसते. तो प्रकाश काही मीटरवरच्या वस्तूलाही प्रकाशमान करतो. 

हा शीतल प्रकाश प्राणी किंवा जिवाणू कसे निर्माण करतात? त्यांच्या पेशीतील विशिष्ट रासायनिक क्रियेने त्याची निर्मिती होते. यात ल्युसिफेरीन गटातील रासायनिक द्रव्ये आवश्यक असतात. प्रत्येक जीवदीप्तीकारक प्राण्यात किंवा जिवाणूत ल्युसिफेरीन गटातील वेगवेगळे रासायनिक द्रव्य असू शकते. हे रासायनिक द्रव्य बदलले की बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचा रंग बदलतो. आणखी एक महत्त्वाचा घटक आवश्यक असतो तो म्हणजे लुसिफरेज नावाचे विकर (एंझाइम). ल्युसिफरेजच्या सान्निध्यात लुसिफेरीन आणि ऑक्सिजनचा संयोग होतो आणि त्यातून प्रकाशनिर्मिती होते. निळय़ा ते हिरव्या रंगांच्या पट्टयात या प्रकाशाची तरंग लांबी ४०० ते ५०० नॅनोमीटर असते. या रासायनिक अभिक्रियेला खूप ऊर्जा लागते.

‘व्हिब्रिओ हारवेयी’ या जीवदीप्तीकारक जिवाणूमुळे सागराच्या भल्या मोठय़ा भागावर रात्रीच्या वेळी निळसर चमक दिसते. अनेक खलाशांनी आणि समुद्र प्रवाशांनी याचा अनुभव घेतला आहे. विविध निळय़ा छटा असणाऱ्या मंद प्रकाशाची उपग्रहाद्वारे छायाचित्रे घेतली आहेत. त्यात १६ हजार वर्ग किलोमीटरचे क्षेत्रफळ या दीप्तीने व्यापल्याचे पाहून या निसर्गनिर्मित प्रकाशाने मानवाचे डोळे दिपून जातात!

– बिपिन देशमाने

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org