डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com
स्वमग्नता असलेले प्रत्येक मूल मतिमंद असतेच असे नाही. मतिमंदत्व हे बुद्धय़ांकाच्या आधारे ठरवले जाते. सर्वसामान्य माणसाचा बुद्धय़ांक ९० ते ११० यांदरम्यान असतो. ९० पेक्षा कमी, पण ७० पेक्षा अधिक बुद्धय़ांक असलेल्या मुलांना गतिमंद म्हटले जाते. त्यांची शिकण्याची गती त्यांच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी असते. ‘डीस्लेक्सिया’ म्हणजे अक्षरे समजणे कठीण जाणे किंवा ‘डीस्कॅल्क्युलिया’ म्हणजे अंकांचे आकलन योग्य न होणे, यांमुळेही मुले शिक्षणात मागे पडू शकतात. मात्र, या मुलांचा बुद्धय़ांक कमी असतोच असे नाही. गतिमंद मुले योग्य शिक्षण मिळाले तर स्वावलंबी होऊ शकतात.
बुद्धय़ांक ७० पेक्षा कमी, पण ५० पेक्षा अधिक असेल, तर त्याला सौम्य मतिमंदत्व म्हटले जाते. मतिमंद मुलांपैकी ८५ टक्के मुले या गटात असतात. यांनाही स्वत:ची काळजी घ्यायला शिकवता येते. ३५ ते ५० बुद्धय़ांक हा मध्यम आणि ३५ पेक्षा कमी बुद्धय़ांक हा तीव्र मतिमंदत्व मानला जातो. मतिमंदत्व येण्याची अनेक कारणे आहेत. डाऊन सिण्ड्रोम गुणसूत्र विकृतीमुळे असतो. अशा मुलांचा चेहरा वेगळा दिसतो आणि बऱ्याचदा त्यांना मध्यम ते तीव्र मतिमंदत्व असते. काही मुलांची गर्भावस्थेत मेंदूची वाढ योग्य प्रमाणात होत नाही. गर्भवती कुपोषित असेल, तिला योग्य प्रमाणात आयोडिन, फॉलिक अॅसिड मिळाले नाही, ती दारू किंवा तंबाखूचे सेवन करीत असेल, विशिष्ट औषधे घेत असेल तरीही गर्भाची मेंदूची वाढ अपुरी होते. गर्भवतीला तीव्र हायपरटेन्शन, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार असतील, तर त्याचेही दुष्परिणाम गर्भावर होतात. जन्माच्या वेळी मेंदूवर आघात किंवा बाळ गुदमरणे, जंतुसंसर्ग यांमुळेही गतिमंदत्व किंवा मतिमंदत्व येऊ शकते.
अशा काही मुलांना जन्मापासून आकडी, फिट येऊ लागते. ती कमी करण्यासाठी औषधांचा उपयोग होत असला, तरी कोणत्याही औषधांनी मतिमंदत्व बरे होते हे सिद्ध झालेले नाही. ऑक्युपेशनल थेरपी किंवा प्ले थेरपी यांनी मुलांची काही कौशल्ये विकसित करता येतात. तीव्र मतिमंदत्व असलेली मुले स्वावलंबी होणे कठीण असले, तरी अन्य प्रकारच्या मुलांना स्वत:ची काळजी घ्यायला शिकवता येते. मुलांचे मतिमंदत्व कमी करण्यासाठी साक्षीभाव उपयोगी होत नाही. पण त्यांच्या पालकांचा तणाव आणि अस्वस्थता साक्षीध्यानाने कमी होऊ शकते.