या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळचा इराणी असलेला पारशी समाज गेल्या दोन सहस्रकांमध्ये भारतात येऊन स्थायिक झाला. भारतीय समाज आणि संस्कृतीशी समरस होऊन या समाजातील अनेक व्यक्तींनी विविध क्षेत्रांमध्ये आपली विशिष्ट ओळख करून ठेवली आहे. पारशी समाजातलेच सोहराब मोदी हे १९३० ते १९७० या काळातले प्रसिद्ध हिंदी चित्रपट आणि नाटय़ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते होत. त्यांच्या निर्मितीतून त्यांनी राष्ट्रप्रेम आणि सुसंस्कृत, समर्थ समाज उभारणीचा संदेश दिला.

सोहराब मेरवानजी मोदी यांचा जन्म १८९७ मध्ये पारशी कुटुंबात मुंबईत झाला. वडील सरकारी नोकरीत. वडलांच्या बदल्या झाल्यामुळे सोहराब काही वर्षे रामपूर आणि काही वर्षे ग्वाल्हेरात राहिले. शालेय जीवनातच नाटकवेडे असलेल्या सोहराबनी वयाच्या २६व्या वर्षी आपला भाऊ फिरोजसह स्वत:ची आर्य सुबोध नाटक कंपनी सुरू करून शेक्सपियरच्या नाटकांच्या प्रयोगांचे देशभर दौरे काढले; परंतु १९३१च्या दरम्यान बोलपट आल्यावर नाटक आणि मूक चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी १९३५ साली ‘स्टेज फिल्म कंपनी’ सुरू केली. त्यांचे पहिले दोन चित्रपट शेक्सपिअरच्या नाटकांवर घेतलेले होते. पहिला ‘खून का खून’ (१९३५) हा ‘हॅम्लेट’वर आधारलेला, तर दुसरा ‘सद-ए-हवस’ (१९३६) हा शेक्सपियरच्या ‘किंग जॉन’वर आधारित. ‘खून का खून’ या चित्रपटामधून पुढे विख्यात झालेल्या अभिनेत्री नसीम बानूचा चित्रपटात प्रवेश झाला. भरदार शरीरयष्टीमुळे सोहराब मोदीही राजाच्या भूमिकांमध्ये शोभले; परंतु दोन्ही चित्रपट विशेष चालले नाहीत!

या दोन चित्रपटांच्या अपयशामुळे मोठा आर्थिक फटका बसलेल्या सोहराबनी आपली हिंमत न हारता नव्या उत्साहाने १९३६ साली आपली मिनव्‍‌र्हा मूव्हिटोन ही चित्रपटनिर्मिती संस्था आणि स्टुडिओ स्थापन केले. मिनव्‍‌र्हाच्या सुरुवातीच्या चित्रपटांचा विषय सामाजिक रूढी आणि सामाजिक समस्या हाच होता. त्यापैकी ‘मीठा जहर’ (१९३८) दारूच्या व्यसनावर; तर त्याच वर्षीचा ‘तलाक’ हा चित्रपट हिंदू स्त्रियांच्या घटस्फोट आणि अवहेलनेवर बेतलेला होता.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sohrab modi indian film actor
First published on: 11-04-2018 at 02:52 IST