दक्षिण पॅसिफिक महासागरातील पापुआ न्यू गिनी आणि फिजी ही दोन द्वीपराष्ट्रे जगातील सर्वाधिक सांस्कृतिक वैविध्ये असलेल्या देशांपैकी आहेत. विशेषत: पापुआ न्यू गिनीमधील बहुतांश जनता दुर्गम, ग्रामीण भागात वास्तव्य करते. यांतील अनेक आदिवासी जमातींचा आधुनिक जगाशी काहीएक संबंध नाही. एखाद्या वेताळकथेमध्ये शोभतील अशा अनेक परंपरा, रूढी पापुआ न्यू गिनी आणि फिजी बेटांवरच्या अनेक जमातींमध्ये अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत प्रचलित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वप्रजातीतील जीवांचा उपयोग अन्न म्हणून करण्याची पद्धत मासे आणि इतर जलचरांमध्ये अधिक प्रचलित असली, तरी मानवासहित सुमारे १५०० प्राणीप्रजातींमध्ये स्वजातिभक्षण करण्याची पद्धत आहे, हे आधुनिक जगात अविश्वसनीय वाटेल! माणसाला माणसाने अन्न म्हणून किंवा काही धार्मिक विधी म्हणून मारून खाण्याची प्रथा प्रशांत महासागरातल्या बेटांमध्ये- विशेषत: पापुआ न्यू गिनी आणि फिजीतील आदिवासींत- अगदी अलीकडेपर्यंत चालू होती! एवढेच नव्हे, तर या भागात मानवी मांसाचा बाजार भरत असे! १८६७ मध्ये ख्रिस्ती मिशनरी थॉमस बेकर आपल्या सहा फिजीयन शिष्यांसमवेत फिजीच्या प्रमुख शहरात आले असताना तेथील राजाच्या चिथावणीने मारले गेले. त्यानंतर त्यांचे मृत शरीर खाण्याचा कार्यक्रम झाला! तेथील संग्रहालयात बेकर यांचे बूट व कपडे जतन करण्यात आले आहेत. २००३ साली बेकर यांच्या नातेवाईकांनी फिजीला भेट दिली. त्या वेळी बेकर यांच्या मारेकऱ्यांच्या वंशजांनी बेकर यांच्या हत्येबद्दल या नातेवाईकांकडे जाहीर माफी व्यक्त केली होती.

पापुआ न्यू गिनीतील कोरोवाइ या जमातीत नरभक्षणाची रूढी अधिक प्रचलित होती. याबाबतीत या जमातीच्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेल्या एका म्होरक्याचे- रातु उद्र उद्र याचे उदाहरण देता येईल. त्याने त्याच्या आयुष्यात तब्बल ८७२ माणसांना मारून खाल्ले! त्या प्रत्येकाची आठवण म्हणून तो एक मोठा दगड पुरून ठेवी. असे ८७२ दगड आजही तिथे पाहावयास मिळतात. २०१२ पर्यंत नरभक्षणाची ही रूढी पापुआ न्यू गिनीत अगदी उघडपणे सुरू होती. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com  

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The human story of papua new guinea akp
First published on: 16-07-2021 at 00:11 IST