वनस्पतींच्या मुळांनी जमिनीमधून शोषलेल्या पाण्याचा, खोड, फांद्या, पाने, फुला-फळांपर्यंतचा, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने होणारा प्रवास ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. पाण्याच्या या वनस्पतीच्या आतील प्रवासावरील संशोधनास एकोणिसाव्या शतकात सुरुवात झाली. १८५०-६०च्या दशकात, कार्ल न्येगेली या स्वीस वनस्पतीशास्त्रज्ञाला सूक्ष्मदर्शकाखाली वनस्पतींच्या पेशींचा अभ्यास करताना असे आढळले की, त्यातील काही पेशी या नळीच्या आकाराच्या असून त्या पाण्याने भरलेल्या आहेत. याचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्याने एक रोप घेतले, त्याच्या मुळावरची माती काढून टाकली आणि त्या रोपाची मुळे लाल रंगाच्या पाण्यात बुडवून ठेवली. काही तासांनी त्याने त्या रोपाच्या मूळ, खोड, फांदी, पान, इत्यादींचे छेद घेऊन त्यांचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले. या छेदांतल्या काही पेशी त्याला लाल रंगाने भरलेल्या आढळल्या. मुळापासून शेंडय़ापर्यंत पाणी वाहून नेणाऱ्या या पेशींना त्याने ‘झायलम’ म्हणजे काष्ठ पेशी हे नाव दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर १८९५ साली जॉन जोली या आयरिश आणि हेन्री डिक्सन या इंग्लिश शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. मॅपल वृक्षाची एक कापलेली फांदी घेऊन तिचा खालचा भाग पाण्यात बुडवला. फांदीचा वरचा भाग काचेच्या भांडय़ात बंदिस्त केला. आता वरच्या भांडय़ात या शास्त्रज्ञांनी पंपाच्या साहाय्याने वातावरणातील हवेच्या दाबाच्या दुप्पट दाब निर्माण केला. या प्रयोगात या शास्त्रज्ञांना असे आढळले की, फांदीवर हवेचा तीव्र दाब असूनही फांदी खालच्या कापलेल्या भागातून पाणी वर खेचतेच आहे. त्यानंतर त्यांनी भांडय़ातील हवेचा दाब आणखी वाढवत नेला. परंतु पाणी खेचले जाण्याचे काही थांबले नाही. हाच प्रयोग त्यांनी वेगवेगळ्या वृक्षांच्या फांद्या घेऊन केला, तेव्हाही त्यांना तेच निष्कर्ष मिळाले. बाहेरून कुठलीही ऊर्जा न देतासुद्धा पाणी फांदीच्या वरच्या भागापर्यंत सहज पोहोचत होते. पाणी मुळांपासून शेंडय़ापर्यंत पोचण्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी जॉन जोली आणि हेन्री डिक्सन तसेच जर्मनीच्या योसेफ बोहम याने, झाडातील काष्ठपेशींतील पाणी हे, एका स्तंभाच्या स्वरूपात असल्याचे मानले. या पाण्याचा शेंडय़ापर्यंतचा प्रवास पाण्याच्या रेणूंतील एकमेकांच्या आकर्षणाद्वारे होत असल्याचे त्यांचा सिद्धांत (कोहिजन-टेन्शन थिअरी) सांगतो.

मात्र एक गोष्ट खरी.. इतक्या वर्षांनंतर, आजही या सिद्धांतावरील मतभिन्नता कायम आहे.

–  डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The journey of the water in this plant
First published on: 26-04-2019 at 01:46 IST