सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विसाव्या शतकात दीडशेहून अधिक स्वायत्त, सार्वभौम नवदेश अस्तित्वात आले, त्यापैकी एक देश म्हणजे मध्य आशियातला तुर्कमेनिस्ताने. कुणाच्याही विशेष खिजगणतीत नसलेला हा देश १९९१ पर्यंत सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक देश होता, तसेच सोव्हिएत युनियनचा एक घटक असलेला प्रजासत्ताक देश होता. २७ ऑक्टोबर १९९१ रोजी सोव्हिएत राष्ट्रसंघातून बाहेर पडून तुर्कमेनिस्तान हा एक स्वयंशासित, स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. तुर्कस्थान या दुसऱ्या एका देशाशी असलेल्या नामसाधम्र्यामुळे तुर्कमेनिस्तानच्या बाबतीत अनेक लोकांचा गोंधळ होतो! या देशाच्या सीमा अग्नेयेस अफगाणिस्तान, दक्षिणेस इराण, पश्चिमेस कॅस्पीयन समुद्र, वायव्येस कजाकिस्तान आणि ईशान्येस उज्बेकिस्तान यांच्या सीमांना मिळतात. तुर्कमेनिस्तानच्या पाच लाख चौ.कि.मी. क्षेत्रफळापैकी साधारणत: ७० टक्के क्षेत्रावर काराकुम वाळवंट पसरलेले आहे. पर्जन्यमान अतिशय कमी असल्याने येथे वृक्षवाढ आणि जंगले अतिशय कमी आहेत, परंतु अधिकांश वाळवंटीय क्षेत्रात बाभळीसारख्या काटेरी झुडपांची वाढ मोठय़ा प्रमाणात होते. पशुपालन हा येथील ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय आहे. अश्गाबाद ही तुर्कमेनिस्तानची राजधानी. अरबी शब्द ‘इश्क’ आणि फारसी शब्द ‘आबाद’ यांचे मिळून नाव बनलेल्या अश्गाबादचा अर्थ होतो ‘प्रेमाचे शहर’! ६० लाख लोकसंख्येच्या तुर्कमेनिस्तानमध्ये बहुसंख्य म्हणजे ९४ टक्के इस्लाम धर्मीय आणि सहा टक्के ख्रिस्ती आहेत. येथील ८६ टक्के जनता ही तुर्कमान वंशाची आणि उर्वरितांपैकी सहा टक्के उझबेक, सहा टक्के रशियन वंशाची आहे. तुर्की वांशिक जमातींपैकी काही जमातींनी ११व्या शतकात इस्लाम धर्म स्वीकारला. अशा जमातींच्या लोकांना मूलत: ‘तुर्कमान’ असे नाव पडले. पुढे यापैकी अनेक लोक उझबेकिस्तान, कजाकिस्तान, इराण वगैरे प्रदेशात पसरले. मध्ययुगीन काळात सुरुवातीस हे लोक स्वत:ला ओगुज तुर्क म्हणवून घेत, पुढे त्यांना तुर्कमेन असे नाव पडले. ओगुज किंवा तुर्कमान या लोकांनी इस्लाम स्वीकारण्यापूर्वी ते बौद्ध धर्मीय होते. सध्या तुर्कमान समाज तुर्कमेनिस्तानव्यतिरिक्त इराण, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान वगैरे देशांमध्येही आढळतो. तुर्कमान हे संबोधन, हे लोक स्वत:ला लावून घेतात ते ‘अस्सल तुर्क’ किंवा खरे तुर्क या अर्थाने! हे लोक तुर्कमानी भाषा बोलतात.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkmenistan country profile zws
First published on: 13-10-2021 at 01:16 IST