वैशाली पेंडसे- कार्लेकर

‘परोक्ष’ आणि ‘अपरोक्ष’ या दोन शब्दांचा आपण सध्या घेत असलेला अर्थ हा मूळ अर्थाच्या बरोबर विरुद्ध आहे किंवा पूर्वी ‘देखणा’ या शब्दाचा अर्थ सध्याच्या ‘डोळस’सारखा होता आणि ‘डोळस’चा अर्थ सध्याच्या ‘देखणा’सारखा होता, अशा काही भाषिक गंमतकथा तुम्ही ऐकल्या असतील.

पूर्वीच्या काळची ‘टीका’ ही आजच्यासारखी ‘टीका’ करणारी नव्हती, हे समजल्यावर तुम्ही आजच्या टीकाकारांनाही माफच करून टाकाल.

अशावेळी मनात एक विचार नक्की येतो, की खरंच कसे तयार होत असतील हे शब्द आणि ठरत आणि बदलत असतील हे अर्थ! दगडाला दगड का म्हणायचं आणि झाडाला झाडच का? मनुष्य आणि मानव हे समानार्थी शब्द असले तरी ‘समोरून एक मनुष्य येत होता’ या वाक्यात आपण मानव हा शब्द का वापरत नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शब्द आणि त्याचा अर्थ याबाबत कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, ‘मानवाच्या हातून आपातत: आणि प्रसंगाच्या जरुरीप्रमाणे नामकरण झाले आणि त्याला समाजातील इतरांची मान्यता मिळाली. अशा तऱ्हेने या संकेतांच्या खुणा म्हणून शब्द रूढ झाले. शब्द ही प्रतीके आहेत. संकेत हा शब्दाचा मुख्य आधार आहे. संकेत शाबूत तोपर्यंत शब्द शाबूत. संकेत नष्ट झाला की शब्द मरतो.’ शब्दाचं रूढ होणं समजून घेताना या संकेताचं रूढ होणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचमुळे एखादा शब्द मग तो कोणत्याही भाषेतला का असेना, का स्वीकारला जातो, एखादा का नाकारला जातो याचं कारण त्यातून निर्माण होणाऱ्या संकेतावर ठरतं. समाजमन तो संकेत स्वीकारतं की नाही आणि कोणत्या अर्थाने स्वीकारतं यावर तो शब्द रूढ होणं अवलंबून राहतं. काळानुसार समाज बदलला आणि तो संकेत पटेनासा झाला किंवा त्याची गरज उरली नाही की हलकेच एकेकाळी स्वीकारलेला तो शब्दही पुन्हा मागे पडतो.

शब्द कसा तयार होतो, ते पाहणे म्हणजेच शब्दसिद्धी. पण शब्द साधण्याबरोबर जेव्हा त्याला समाजमनाकडून संकेताच्या पसंतीची ‘सिद्धी’ प्राप्त होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने शब्दसिद्धी झाली असं म्हणता येईल.

vaishali.karlekar1@gmail.com