डॉ. निधी पटवर्धन

भाषेत भारदस्तपणा आणण्यासाठी उर्दू शब्दांची पेरणी केली जाते. ‘भारदस्त’ हा असाच फारसीवरून आलेला उर्दू शब्द. मराठीत ‘धीरगंभीर भाषा’ म्हणू शकू काय? मागील भागात आपण उर्दू शब्दांसाठी प्रतिशब्द पाहिले. या शेवटच्या भागात आणखी काही प्रतिशब्द पाहूया. ही कोणाची औज़ारे आहेत इथं? – औज़ारेला उपकरणे/ अवजारे म्हणूयात. माझे खेळायचे कंचे कुणी पाहिले का? इथं कंचा- काचेची गोटी म्हणूयात. गनीम मोठा, तरी आम्ही जाहंबाज- म्हणजे शत्रू/ प्रतिस्पर्धी मोठा तरी आम्ही हुषार, धाडसी. गद्दारी नको- कृतघ्नता/ देशद्रोह नको. काहीतरी गफलत वाटतेय- काही असावधानी/ निष्काळजीपणा वाटतोय. जास्त पैसे सांगू नका राव, वाजवी दरात द्या- योग्य/ रास्त/ न्याय्य भावात द्या.

फारसी ‘सवारी’ वरून मराठीत ‘स्वारी’ शब्द आला आहे. घोडय़ावर बसणाऱ्या मनुष्यासाठी बहुतेक वेळेला हा शब्द वापरला जातो. याच्या अर्थाचे सामान्यीकरण आणि विशेषीकरण बरेच झाले आहे. कुस्तीतील स्वारी, राजाची स्वारी, वेताळाची स्वारी वगैरे प्रयोग रूढ आहेत. हैराणला म्हणूया व्याकूळ वा त्रस्त. आता काही नेहमीच्या वापरातले शब्द व प्रतिशब्द पाहू. गरीब- निर्धन, गर्मी- उष्णता, गर्म- कढत/ तापलेला, गुलाम- दास, घटिया- सामान्य प्रतीचा/ हलका, चस्का- चटक, गोडी, छैला – रंगेल, तंग – आवळलेला/ घट्ट, तंगी- टंचाई, चणचण, तय्यार- सुसज्ज, ताकीद- बजावून सांगणे, दंग- थक्क, दर्द- दु:ख/ पीडा.

अस्तराला काय प्रतिशब्द होऊ शकतो? ‘कपडय़ाला आतून लावलेले कापड’ असेच म्हणू या! नाहीतर फारफार तर ‘खालचा, आतला पदर’ म्हणू शकतो. पण हट्टाने प्रतिशब्द निर्माण करायलाच हवेत असे नाही. आता वाचकांसाठी काही शब्द, तुम्हाला याचे प्रतिशब्द माहीत आहेत का? – दुकान, नीलम, पंजर, पलीता, फ़ालूदा, बला, मुमताज़्‍ा, राही, रोब, लहजा. बघा, जमतंय का? जेव्हा मराठी प्रतिशब्द उपलब्धच नसेल तेव्हा अन्य भाषेतील शब्द जसाच्या तसा (म्हणजे तत्सम पद्धतीने) अथवा त्यात काही बदल करून (म्हणजे तद्भव रीतीने) आपल्या भाषेत स्वीकारला जाऊ शकतो, स्वीकारला जावा आणि भाषाशास्त्रीयदृष्टय़ा बोलायचे झाले, तर असे शब्द भाषेत सहजपणे स्वीकारले जातातच, असे आजवरचा भाषिक इतिहास आपल्याला सांगतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nidheepatwardhan@gmail.com