कुतूहल : व्यापारासाठी गणिताचा उपयोग

गोदामामध्ये माल साठवण्यासाठी किमान साधनांची व्यवस्था गणितातील ‘कप्प्यांचा नियम (पिजनहोल प्रिन्सिपल)’ वापरून केली जाते.

वस्तू तसेच सेवा यांचे उत्पादन झाल्यापासून त्या ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत होणारे आर्थिक व्यवहार म्हणजेच व्यापार. विशेष म्हणजे, त्यासाठी प्राथमिक अंकगणिती पद्धतींपासून (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, शेकडेवारी, व्याज) प्रगत गणिती संकल्पनाही वेळोवेळी वापरल्या जातात. खरेदी-विक्री आणि जमा-खर्च यांचा मागोवा घेणे, बाजाराचा अभ्यास करून मालाची इष्टतम किंमत ठरवणे यासाठी गणिती प्रारूपे उपयोगी ठरतात.

उत्पादनाच्या निर्मितीप्रक्रियेपासूनच ‘आखूडशिंगी, बहुदुधी’ या उक्तीप्रमाणे कमीत कमी वेळात आणि खर्चात, मर्यादित धोके पत्करून जास्तीत जास्त उत्पादन आणि नफा मिळवणे हे उद्दिष्ट असते. या सर्व गोष्टींसाठी गणिती शाखा ‘प्रवर्तन संशोधन (ऑपरेशनल रिसर्च)’ उपयोगी पडते. उदा. रेषीय प्रायोजन (लिनिअर प्रोग्रामिंग) पद्धतीचे गणिती प्रारूप वापरून निर्णय घेतले जातात. तसेच मालाचा साठा आणि त्याचे विविध ठिकाणी वितरण करताना वाहतुकीस लागणारा वेळ आणि खर्च यांचे इष्टतम नियोजन करणे हे रेषीय प्रायोजनाची विशिष्ट प्रारूपे वापरून शक्य होते.

गोदामामध्ये माल साठवण्यासाठी किमान साधनांची व्यवस्था गणितातील ‘कप्प्यांचा नियम (पिजनहोल प्रिन्सिपल)’ वापरून केली जाते. इष्टतम प्रमाणात मालाचा साठा राखणे, कारखाने स्वयंचलित करणे यांबाबतच्या गुंतागुंतीच्या निर्णयप्रक्रियेत क्रमश: ‘साठा नियंत्रण (इनव्हेंटरी कंट्रोल)’ आणि ‘गतिमान प्रायोजन (डायनॅमिक प्रोग्रामिंग)’ अशा गणिती पद्धतींचा उपयोग होतो. मागील काही काळातील वस्तूंची मागणी, उत्पादन, नफा-तोटा, निर्मिती आणि वितरणासाठी होणारा खर्च या सर्व बाबींच्या परस्परसंबंधांचा सखोल अभ्यास संख्याशास्त्राच्या ‘रेषीय समाश्रयण (लिनिअर रिग्रेशन)’, ‘कालक्रमिका विश्लेषण (टाइम सीरिज अ‍ॅनेलिसिस)’ व अन्य पद्धती वापरून केला जातो. त्यावरून भविष्यातील व्यापारवृद्धीचे, बदलांचे अंदाज बांधता येतात.

शेअर बाजारातील चढ-उतार दाखवणारा सेन्सेक्स, देशातील औद्योगिक उत्पादनांचा निर्देशांक, नागरी-ग्रामीण ग्राहकांचे उपभोक्ता मूल्य निर्देशांक असे व्यापारातील गुंतवणुकीसाठी निर्णय घेण्यास मदत करणारे घटक गणिताच्या मदतीनेच तयार केले जातात. भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दरमहा प्रसिद्ध केली जाणारी अशी माहिती तिचा सांख्यिकी विभागच संकलित करतो. व्यापारात गणिताचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि संगणकामार्फत पदोपदी उपयोग होतो, त्यामुळे सर्व व्यापार व्यवस्थापन पाठ्यक्रमात (एमबीए) गणिती व संख्याशास्त्रीय पद्धती हा अविभाज्य भाग आहे. त्याशिवाय व्यापाराला वाहिलेल्या ‘वित्तीय गणित (फायनॅन्शिअल मॅथेमेटिक्स)’ या विषयात पदवी आणि पदव्युत्तर पाठ्यक्रमही आता भारतातील काही शिक्षण संस्थांमध्ये सुरू झाले आहेत. – प्रा. श्यामला जोशी     

 

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Use of mathematics for trade production of goods and services akp

ताज्या बातम्या