डॉ. माधवी वैद्य

आपला देश म्हणजे मनात श्रद्धाअंधश्रद्धांचे उदंड पीक उपजवणारा देश आहे. किती प्रकारच्या श्रद्धा-अंधश्रद्धांचा खेळ आपल्या मनात सुरू असतो नाही का? म्हणजे घरातून बाहेर पडताना उजवा पाय आधी टाकावा, बाहेर जाताना ‘जातो’ नाही तर ‘येतो’ म्हणावे किंवा चालताना मांजर आडवी गेली तर नियोजित काम होत नाही, असे अनेक समज असतात. आपल्याकडे तर एक म्हणच आहे ना? ‘तीन तिघाडा आणि काम बिघाडा’ म्हणून एखादे काम करायला जात असाल तर तिघांनी जाऊ नये असे म्हणतात. ‘डावा डोळा लवणे’ या संकल्पनेवरून तर अनेक गाणीही रचली गेली आहेत. अमुक केल्याने पुण्य मिळते आणि तमुक केल्याने आपण पापाचे धनी होतो अशा एक ना दोन हजार श्रद्धा-अंधश्रद्धांच्या कल्पना आपण उराशी बाळगतो. या सर्व कल्पनांसह सुख मिळेल या आशेने मार्गक्रमण करत राहतो. 

अशीच एक संकल्पना म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन, तिथल्या पवित्र नदीत स्नान करणे. त्यामुळे पुण्य लाभते, पाप धुऊन निघते अशी अनेकांची श्रद्धा असते. फक्त हल्लीच्या काळात नदीच पवित्र आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्या नदीत उभे राहायचे आणि एक डुबकी मारायची म्हणजे आपले डोळे बंदच असले पाहिजेत आणि मनही श्रद्धेने तुडुंब भारलेले असले पाहिजे. याच कटू सत्यावर प्रकाश टाकणारी एक म्हण म्हणजे ‘स्नान करून पुण्य घडे, तर पाण्यात बेडूक थोडे?’ एक क्षण डुबकी मारून जर इतकी पुण्यप्राप्ती होत असेल तर नदीत अहोरात्र राहणाऱ्या त्या बेडकाला किती पुण्य लाभत असेल, त्याची कल्पनाच केलेली बरी! आणि खरे म्हणजे नदीत एक डुबकी मारल्याने असे काय पुण्य प्राप्त होणार? त्यापेक्षा चांगले कृत्य हातून घडल्यानेच पुण्यप्राप्ती होईल! असा या म्हणीचा मथितार्थ.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

madhavivaidya@ymail.com