– डॉ. माधवी वैद्य madhvivaidya@ymail.com
लतिकाबाई म्हणजे अतिउत्साहाने वाहणारा ऊर्जेचा स्रोत. आळस, निरुत्साह, उदासीनता वगैरे वगैरे शब्द त्यांच्या रोजनिशीतच नव्हते. महिला मंडळात सगळय़ा बायकांची जमण्यासाठी जी वेळ ठरलेली असेल त्याच्या किमान अर्धा तास आधी लतिकाबाई तिथे हजर असणारच. आपण कसे सर्वाच्या आधी हजर असतो, आपण कशा सर्वाना आदर्श ठरतो, याबद्दल आपलीच आपण बढाई मानण्याचा सोस वाटणाऱ्या या लतिकाबाई!
सगळे कसे भराभर उरकण्याकडे कल असायचा त्यांचा. म्हणजे उद्या सत्यनारायणाची पूजा असली तर आजच पूजेची तयारी झाकपाक करून ठेवलेली असायची. प्रत्येक सणवार हा त्यांच्या उत्सवी स्वभावाला निमंत्रण असायचे. अशा त्यांच्या स्वभावाला त्यांचे वयही रोखू शकले नाही. पन्नाशी आली तरी त्यांचे हे धडाडधाड वागणे सर्वानाच दमवणारे होते. तशातच त्यांच्या मुलाचे लग्न ठरले, सुनेला दिवसही राहिले. मग काय विचारता! अर्थातच त्यांच्या उत्साहाची नदी दुथडी भरून वाहू लागली. त्या म्हणू लागल्या, ‘‘माझं बाई कसं वेळेच्या आधीच सर्व तयार असतं! डोहाळजेवणाची, बारशाचीही तयारी जवळजवळ पूर्ण झाली. सुनेला दिवस जाता क्षणीच माझ्या मनात पाळणा हलायला लागला. परवाच मी छानशा पाळण्याची ऑर्डर देऊनही आले.’’ हे त्यांचे वागणे इतरांच्या दृष्टीने कौतुकाचे आणि उत्साहाचे वाटत असले तरी हा उत्साह त्या सुनेला आणि तिच्या घरच्यांना पचवणे जरा अवघडच जात होते. एकदा सुनेच्या आईला तिच्या मैत्रिणीने विचारले, ‘‘काय गं, तुझ्या लेकीची सासू अगदी उत्साही दिसते आहे!’’ तेव्हा तिची आई तिला म्हणाली, ‘‘खरं सांगू का? तिची सासू म्हणजे ‘धडमधाडवा आणि अवसेला पाडवा’ आहे बघ.’’ त्या मैत्रिणीने विचारले, ‘‘म्हणजे?’’ त्यावर तिची आई म्हणाली, ‘‘अगं, म्हणजे अतिच उत्साह. उतावीळपणा म्हणजे इतका की अमावास्येलाच पाडव्याची गुढी उभारतील आणि त्याचा परत गाजावाजाही करतील. जरा सबुरी म्हणून कशी ती नाहीच बघ. त्यांच्याशी जमवून घेता घेता पोरीची दमछाक होते गं.’’