– डॉ. नीलिमा गुंडी

समाजमनात वाक्प्रचार घर करून असतात. त्यामुळे विविध साहित्यकृतींच्या शीर्षस्थानी वाक्प्रचार मानाने विराजमान झालेले दिसतात. त्याची ही काही उदाहरणे आहेत.

‘सुदाम्याचे पोहे’ हा वाक्प्रचार एका पुराणकथेवर आधारित आहे. श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा द्वारकाधीश झालेल्या आपल्या मित्राला भेटायला गेला, तेव्हा त्याने आपल्या ऐपतीनुसार कृष्णाला पोह्यांची पुरचुंडी भेट दिली. श्रीकृष्णानेही ती भेट आनंदाने स्वीकारली. त्यातून त्यांच्या मैत्रीतील सच्चेपणा व्यक्त झाला. त्यामुळे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो, प्रेमाने दिलेली साधीशी भेट. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी आपल्या एका पुस्तकाचे नाव ठेवले ‘सुदाम्याचे पोहे’. त्यातून लेखकाचा विनय आणि हृद्य भाव व्यक्त झाला आहे. ‘एरंडाचे गुऱ्हाळ’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, वायफळ उद्योग. उसापासून गोड रस काढण्याचे काम गुऱ्हाळात होते. मात्र एरंड उसासारखा उंच असला, तरी त्याच्यापासून तसा रस निघत नाही! म्हणून चिं. वि. जोशी यांनी आपल्या विनोदी कथासंग्रहाचे नाव ‘एरंडाचे गुऱ्हाळ’ असे ठेवून विनोद साधला आहे.

‘खोगीरभरती’ हाही एक वाक्प्रचार आहे. खोगीर म्हणजे घोडय़ावर घालावयाचे कापडी किंवा चामडय़ाचे जीन होय. खोगीर मऊ व फुगीर व्हावे, म्हणून त्यात चिंध्यांसारख्या निरुपयोगी वस्तू भरतात. त्यामुळे खोगीरभरती या वाक्प्रचाराचा अर्थ होतो कुचकामी गोष्टी. पु . ल. देशपांडे यांनी आपल्या एका विनोदी लेखसंग्रहाचे शीर्षक ‘खोगीरभरती’ असे ठेवले आहे. असे शीर्षक देऊन त्यांनी स्वत:चीच जणू खिल्ली उडवली आहे! नाहीतरी विनोद हा विषय एकेकाळी आपल्याकडे फारसा प्रतिष्ठेचा नव्हताच, त्यामुळे त्यांनी मुद्दामही तसे शीर्षक दिले असावे!

‘बारा गावचे पाणी पिणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, अनुभवसंपन्न होणे. वसंत बापट यांनी आपल्या प्रवास- वर्णनाला ‘बारा गावचं पाणी’ हे नाव दिले आहे. त्यातून कोणतेही पाणी पचविण्याची रग आणि व्यापक अनुभवविश्व हे लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू लक्षात येतात.

आणखीही अशी चपखल शीर्षके आठवतील; त्यातील वाक्प्रचार समाजमनाला आवाहन करण्यात यशस्वी ठरलेले दिसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nmgundi@gmail.com