– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

पहिल्या महायुद्धकाळात जर्मनांनी रशियावर आक्रमण करून त्यांच्या साम्राज्यातील मोठय़ा प्रदेशावर कब्जा केला. त्यामध्ये संपूर्ण लिथुआनिया प्रदेश जर्मनीव्याप्त झाला. १९१८ मध्ये महायुद्धात जर्मनी दोस्तराष्ट्रांकडून पराभूत होऊन त्यांनी लिथुआनियावरील ताबा सोडला. या सत्तांतरांच्या धामधुमीचा लाभ उठवीत लिथुआनियाच्या स्वातंत्र्यवाद्यांनी १९१८ मध्ये स्वतंत्र लिथुआनियाची घोषणा केली. नव्या देशाची राज्यघटना तयार करून ऑगस्टीनॉस वोल्डेमार यांची पंतप्रधानपदी नियुक्ती होऊन लोकशाहीवादी सरकार स्थापन झाले. पुढे दुसऱ्या महायुद्धाला सुरूवात झाली. ऑगस्ट १९३९ मध्ये नाझी जर्मनी आणि सोव्हिएत युनियन यांच्यात मोलोटोव्ह-रिबेन्ट्राप हा परस्परातील युद्धबंदीचा करार झाला. या कराराला हिटलर-स्टालीन करार असेही म्हटले जाते. या करारान्वये या दोन्ही सत्तांनी पोलंडवर आक्रमण करून त्याची फाळणी केली. पूर्वेकडील निम्मा पोलंड रशियाकडे तर पश्चिमेकडील जर्मनीच्या वर्चस्वाखाली आला. फिनलँड, लिथुआनिया आणि इतर बाल्टिक देश हा प्रदेश या दोन सत्तांनी आपसात वाटून घेतला. या वाटणीत लिथुआनिया सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली गेला.

१९४० च्या जूनमध्ये रशियाने लिथुआनियासमोर एक प्रस्ताव ठेवला आणि लिथुआनियाच्या नेत्यांना नाइलाजाने तो स्वीकारावा लागला. या प्रस्तावात या देशातले तत्कालीन सरकार बरखास्त करून रशियाच्या सल्ल्याने तिथे साम्यवादी सोव्हिएत सरकार स्थापन करणे, सोव्हिएत रेड आर्मीची २० हजार सैनिकांची फौज लिथुआनियाच्या प्रदेशात राहील आणि लिथुआनियाच्या प्रदेशात सोव्हिएत रशियाचे पाच लष्करी तळ तयार केले जातील अशा अटी होत्या. आणि याच्या बदल्यात पोलंडचा प्रगत असे व्हिल्नीयस हे शहर आणि परगाणा लिथुआनियाला मिळणार होते. या अटी स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे नेत्यांनी तो प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर लिथुआनियन सोव्हिएत सोश्ॉलिस्ट रिपब्लिक सरकारची स्थापना झाली. सोव्हिएत युनियनने लिथुआनियातील कम्युनिस्टेतर सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली. इतर पक्षांचे नेते आणि कम्युनिस्ट सरकारचे बुद्धीजीवी विरोधक अशा १२००० व्यक्तींना सैबेरियात हद्दपार केले गेले, लिथुआनियन शेतकऱ्यांचा शेतसारा दुपटीने वाढविला गेला. अशा प्रकारे रशिया, लिथुआनियन राजकीय व्यवस्थेचे आणि समाजाचे पद्धतशीर सोव्हिएतीकरण करीत असतानाच नाझी जर्मनीने २२ जून १९४४ रोजी सोव्हिएत युनियनवर जबरदस्त आक्रमण केले.