– डॉ. सुहास कुलकर्णी
सांडपाण्यातील विषारी सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांची तीव्रता मोजण्यासाठी सीओडी (मिलिग्रॅम/लिटर) हे एकक वापरतात. हे मोजमाप सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या ऑक्सिडीकरणासाठी लागलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण दर्शवते; त्याला ‘केमिकल ऑक्सिजन डिमांड’ किंवा ‘सीओडी’ असे म्हणतात. ही त्या सांडपाण्याच्या गुणवत्तेची चाचणी आहे. ‘सीओडी’ची पातळी जर जास्त असेल तर त्या पाण्यात विरघळणाऱ्या आणि न विरघळणाऱ्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांची पातळी जास्त आहे असे समजावे. अर्थातच प्रदूषणाची पातळीदेखील जास्त आहे, असा त्याचा अर्थ होतो. या चाचणीत फक्त रासायनिक पद्धतीने खंडन होणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचे मापन केले जाते. ‘सीओडी’ची पातळी काढण्याच्या पद्धतीला ‘बीओडी’ काढण्याच्या पद्धतीपेक्षा कमी वेळ लागतो. ज्या सांडपाण्यात विषारी सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणात असतात आणि जे जैविक पद्धतीने खंडन करता येत नाहीत, अशा परिस्थितीत ‘सीओडी’ पद्धत वापरली जाते.
पाण्याच्या वापरानंतर जे पाणी अशुद्ध होऊन पुन्हा वापरण्यास लायक नसते, अशा पाण्याला सांडपाणी म्हणतात. औद्याोगिक वापरातून उदाहरणार्थ मद्यार्क, कीटकनाशके, स्फोटके आणि रसायने तयार करणाऱ्या कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात प्रमाणाबाहेर घातक रसायने असू शकतात. अशा विषारी सांडपाण्यात सूक्ष्मजीवदेखील जिवंत राहू शकत नाहीत. असे दूषित सांडपाणी, जवळपास उपलब्ध असलेल्या चांगल्या पाण्यात सोडले गेल्यास मोठया प्रमाणात पाणी प्रदूषण होऊन ते पाण्यातील जीवांना तसेच ते वापरणाऱ्या व पिणाऱ्या प्राणी, पक्षी व मानवी जीवांना धोकादायक ठरू शकते. असे होऊ नये याकरिता, दूषित पाणी हे नैसर्गिक पाण्यात सोडण्याआधी त्यावर प्रक्रिया करून त्यातील सेंद्रिय व घातक रसायने यांचे विघटन करणे आवश्यक आहे; जेणेकरून पाण्यातील ऑक्सिजनची मागणी कमी होऊन, त्यापासून संभावित धोके कमी करता येतात. सर्व जीवांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही निर्बंध घालून दिलेले आहेत. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा सीओडी २,००,००० ते ५,००,००० मिलिग्रॅम/लिटर एवढा असतो. त्यावर प्रक्रिया करून तो २५० मिलिग्रॅम/लिटरच्याही खाली आणावा लागतो. सांडपाणी व्यवस्थापनात सीओडी कमी करण्यासाठी दोन तंत्रे वापरली जातात. पहिल्या प्रकारात कोअॅग्यूलेशन आणि फ्लॉक्यूलेशनद्वारे सांडपाण्यातील कोलाइडल (अघुलशील) घनपदार्थ काढून टाकले जातात. दुसऱ्या प्रकारात ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या व ऑक्सिजनवर अवलंबून नसलेल्या सूक्ष्मजीवांचा वापर करून ऑक्सिजनची गरज कमी केली जाते.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org