– डॉ. रंजन गर्गे

मॅक क्रेडी या शास्त्रज्ञाने १९१५ साली ‘मोस्ट प्रोबेबल नंबर’ या तंत्राने संख्याशास्त्रीय पद्धत वापरून पाण्याच्या नमुन्यातील जीवाणूंची संख्या मोजण्याचे तंत्र विकसित केले. पुढे त्यावर संशोधन करून कोचरेन यांनी १९५० साली ही पद्धत प्रमाणित केली. पाण्यातील रोगकारक जीवाणूंची संख्या प्रत्यक्ष मोजणे जवळजवळ अशक्य आहे. यात गुणात्मक पद्धतीचा अवलंब केला जातो. यापैकी एक पद्धत म्हणजे ‘एम.पी.एन.’ (मोस्ट प्रोबेबल नंबर) तंत्र. ‘एम.पी.एन.’ म्हणजे १०० मिलिलिटर पाण्यात असलेल्या जंतूंची संख्या मोजण्याचे हे संख्याशास्त्रीय तंत्र होय. पाण्यातील रोगकारक जीवाणूंचा प्रतिनिधी म्हणून इश्चेरीशिया कोलाय याला दर्शक जीवाणू मानले जाते. अशा जीवाणूची विशिष्ट द्रव माध्यमात वाढ झाली तर त्या माध्यमाचा रंग बदलतो. रंग बदलल्यास त्याला ‘पॉझिटिव्ह’ प्रक्रिया म्हणतात. ही पद्धत तीन पायऱ्यांमध्ये पूर्ण केली जाते. पहिली पायरी म्हणजे ‘प्रिझम्टिव्ह’ चाचणी. दुसरी चाचणी असते ‘कन्फर्म्ड’. आणि तिसरी ‘कम्प्लिटेड’. यात प्रदूषणाचा अंदाज बांधण्यासाठी पहिली चाचणी पुरेशी ठरते.

या तंत्रात १५ परीक्षानलिकांमध्ये, पाच नलिकांचा एक संच या पद्धतीने, ‘मॅकॉन्की पर्पल’ हे माध्यम विशिष्ट प्रमाणात विभागून टाकण्यात येते. प्रत्येक नलिकेत डरहॅम नलिका उपडी टाकण्यात येते. या नलिकांतील माध्यम निर्जंतुक करून संचातील नलिकांमध्ये प्रत्येकी १०, १ आणि ०.१ मिलिलिटर प्रमाणात तपासावयाचे पाणी विभागून टाकले जाते. या सगळ्या नलिका ३७ अंश सेल्सिअस तापमानाला २४ तास ठेवल्या जातात. पाण्याच्या नमुन्यात जर कोलायफोर्म असतील तर डरहॅम नलिकेत वायूचे बुडबुडे दिसतात आणि माध्यमाचा लाल रंग पिवळा होतो. कोलायफोर्मच्या तीव्रतेनुसार रंगात फरक दिसतो. याला ‘प्रिझमटिव्ह पॉझिटिव्ह’ असे म्हणतात.

समजा, पहिल्या संचातील पाच नलिकांमधील माध्यम पिवळे झाले. दुसऱ्या संचातील दोन नलिकांमधील माध्यम पिवळे झाले आहे आणि तिसऱ्या संचातील ० (शून्य) नलिकांमधील माध्यम पिवळे झाले आहे. असे असेल तर, या ‘प्रिझम्टिव्ह’ चाचणीचा निष्कर्ष ५- २- ० असा वाचला जातो. या संदर्भातील मॅक क्रेडी तक्त्याचा वापर करून, या निष्कर्षानुसार आपल्याला १०० मिलिलिटर पाण्याच्या नमुन्यात कोलायफोर्म परिवारातील जंतूंची संख्या ‘एम.पी.एन.’ इंडेक्सनुसार ‘५०’ इतकी निश्चित करता येते. या संख्येनुसार पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता उत्तम, चांगली की अयोग्य अशी प्रतवारी करता येते.