घरामध्ये एकमेकांवर रागवा-रागवी होण्याचे प्रसंग अनेक वेळा घडत असतात. अशा वेळी घरातलं दृश्य बघण्यासारखं असतं. ‘शांत व्हा!’ असं सांगणारी व्यक्ती हीच वाक्यं जोरात ओरडून सांगत असते. कारण तसं ओरडण्याशिवाय त्या व्यक्तीकडे त्या वेळी तरी दुसरा पर्याय नसतो. पण नेमकी समस्या इथेच तर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शांत कसं व्हायचं हे दुसऱ्या कोणालाही शिकवायचं असेल, तर आधी स्वत:ला शांत असावं लागेल. विशेषत: घरातली लहान मुलं राग व्यक्त करणं हे घरातल्याच कोणाकडून तरी शिकतात. मोठी मुलं इतर अनेकांकडून शिकतात.

असे प्रसंग कमीत कमी यावेत म्हणून राग कधी येतो याची कारणं शोधायला हवीत आणि त्यानंतर स्वत:ला शांत करण्याचे मार्गही तितक्याच शांतपणे शोधायला हवेत. या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. यातली कोणतीही एक करून चालणार नाही.

सुरुवातीला जर हे जमत नसेल तर का जमत नाही, याविषयी इतरांशी बोलायला हवं. कळत्या वयातल्या मुलांना या अडचणी समजतात. त्यांच्याशी बोलायला हरकत नाही. राग आल्यामुळे चांगल्या गोष्टीचा, एखाद्या चांगल्या नात्याचा कसा विचका होतो, कशा चुका घडतात आणि त्या कधीही बदलता येत नाहीत, यावर वेळेत बोललेलं बरं!

सतत हेच घडत राहिलं तर ‘रागीट’ हीच एकमेव प्रतिमा शाश्वत स्वरूपात राहील. त्या प्रतिमेविषयी बोलायला हवं. आपण रागावलो की कसे दिसत असतो, कसे वागतो, या वागण्यामुळे इतरांच्या मनात नेमकं काय येतं हे जाणून घ्यायला हवं.

त्याचप्रमाणे चिडून रागावून नेहमीच आपल्या मनासारखं घडत नसतं. उलट केवळ रागामुळे परिस्थिती कशी हाताबाहेर जाते याची उदाहरणं अवश्य द्यावीत. अशा प्रकारे प्रतिक्रिया देण्याऐवजी काय करता आलं असतं हे पुन्हा पुन्हा आठवण्याचे गरज असते. रागाचे दुष्परिणाम कळायला हवेत. अशा परिस्थितीत अन्य मार्गानी ही परिस्थिती कशी हाताळता आली असती हे जाणवेल आणि शांत राहिलं तर गोष्टी जास्त चांगल्या प्रकारे घडून येऊ शकतात हे ही लक्षात येईल.

आपल्या मनातल्या भावना हा रसायनांचा खेळ आहे. सततच्या रागामुळे नकारात्मक रसायनं मेंदूचा ताबा घेतात. ही रसायनं रक्तात मिसळून संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे रागावर मार्ग काढायलाच हवेत.

डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Way on anger abn
First published on: 20-08-2019 at 00:11 IST