‘कासदाह’ आजार प्रामुख्याने दुभत्या जनावरांमध्ये आढळतो. यास ‘काससुजी’ किंवा ‘दगडी’ असेही म्हणतात. जीवाणू/ विषाणू जंतुसंसर्गामुळे कासदाह होतो. वासरांच्या दातामुळे सडाला इजा होणे, दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ नसणे, दुधाची भांडी व गोठा अस्वच्छ असणे, वेळेवर दूध न काढणे, त्यामुळे कासेत दूध साठून राहाणे या कारणांमुळे कासेत जंतुसंसर्ग होतो.
यामध्ये कासेला वा एखाद्या सडाला सूज येते किंवा सड टणक होतो, त्यांना स्पर्श केल्यास जनावराला वेदना होतात, सडातून पातळ दूध किंवा पाणी येते, आजार वाढल्यास पू किंवा रक्त येते, जनावरास ताप येतो, भूक मंदावते.
आजारी जनावरास वेळेवर उपचार मिळाला नाही, तर संपूर्ण कास दगडासारखी होते. त्यास ‘दगडी कास’ म्हणतात. स्तनदाह झालेल्या जनावरास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत. प्रसंगी पशुवैद्यकाच्या सहाय्याने प्रथम सडात खास नळी घालून सडातील संपूर्ण दूध काढून टाकावे. त्यानंतर सडात सोडण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या प्रतिजैविकांच्या टय़ूब्ज प्रत्येक दिवशी प्रत्येक बाधित सडात एक याप्रमाणे चार-पाच दिवस सोडाव्यात. तसेच प्रतिजैविकांची इंजेक्शन्स तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून सलग तीन ते पाच दिवस टोचून घ्यावीत. कास घट्ट झाल्यास, कासेला दररोज एखाद्या औषधी मलमाने मालिश करावे. सडावर जखम असल्यास दूध काढण्यापूर्वी ती पोटॅशियम परमँगनेटच्या सौम्य द्रावणाने धुवून त्याची योग्य देखभाल करावी. उपचारादरम्यान बाधित सडातील दूध वापरू नये. शेवटची टय़ूब सडात सोडल्यानंतर त्या सडाचे दूध साधारणत: तीन-चार दिवसांनंतर वापरण्यास हरकत नाही.
सडातून रोगजंतूंचा शिरकाव होऊ नये, म्हणून रोगप्रतिबंधक उपाय करावेत. यामध्ये दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ असावी. गोठय़ात जनावरांची गर्दी नसावी. गोठा स्वच्छ व सपाट असावा. वासरांची शिंगे आठव्या ते दहाव्या दिवशी काढावीत. दूध काढण्यापूर्वी कास धुवावी. दूध काढण्याच्या यंत्रामध्ये दोष नसावा. स्तनदाह झालेली जनावरे वेगळी बांधावीत. दूध काढल्यानंतर गायीला २५-३० मिनिटे जमिनीवर बसू देऊ नये. १५ दिवसांतून किंवा महिन्यातून एकदातरी दूध परीक्षण करावे. नवीन गायी विकत घेताना कासेची पाहाणी करावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी.. – चेंडूफळी (क्रिकेट)
चेंडूफळी या खेळाचे वर्णन तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी त्यांच्या अनुभवामृत (अमृतानुभव) या तत्त्वकाव्यात केले आहे. या खेळाचे आधुनिक रूप म्हणजे क्रिकेट. आम्ही क्रिकेटचा शोध लावला असले काही तरी भंकज सिद्ध करण्यासाठी मी हे लिहीत नाही. क्रिकेट हा एक मोठा लोकप्रिय खेळ झाला आहे आणि त्यातली अनिश्चितता आणि थरार आपण सगळेच अनुभवतो. आपला संघ जिंकला तर आपल्या मनात आनंद आणि उन्माद आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मनात हाहाकार माजतो, पण हा शेवटी खेळच असतो आणि हल्लीहल्ली पैसे खाऊन खेळाडू सामने जाणीवपूर्वक हरतात, असे सिद्ध झाल्यामुळे या खेळाचा खेळखंडोबा झाला आहे हे लक्षात येते आणि ‘आपण किती मूर्ख’ असे वाटत राहते. सगळे आविष्कार शेवटी मनाचे असतात आणि ते बाह्य़ जगताशी संबंधित असतात. त्या मनामागचे चैतन्य अबाधित राहते आणि मनाला अनेक खेळ दाखविते, अशी कल्पना आहे. त्यात देवादिकांचाही समावेश आहे, पण त्याबद्दल नंतर. चेंडूफळीबद्दलच्या अमृतानुभवातल्या ओव्या विंदा करंदीकरांच्या भाषेत म्हणतात:
स्वत:च चेंडू सुटे। मग स्वत:वर आपटे। त्याने उसळून दाटे। स्वत:च।।
अशी जर चेंडूफळी। पाहाल कोणे वेळी। तर म्हणा ती खेळी। प्रबोधाची
प्रबोधाची म्हणजे जाणिवेची. हे जग सुटते, आदळते, दाटून परत येते या सगळ्यांची पाश्र्वभूमी आणि त्यातले इंगित चैतन्य असते आणि त्यातून हा खेळ घडतो. त्याचे आणखीही समर्पक वर्णन पुढील ओवी करते. पाणी लाटांच्या निमित्ताने। जसे स्वत:च हेलावते। तसे ब्रह्मची ब्रह्मावर खेळते। आनंदाने।। हा आनंद ब्रह्माचा आहे. आपण पेढा खाल्ल्यावर होतो तसला हा आनंद नाही. कारण जिभेला स्वत:ची चव कळत नाही, नाक स्वत: सुगंध होत नाही किंवा कान म्हणजे शब्द नसतात. ही तिन्ही ज्ञानेंद्रिये चैतन्याचे आविष्कार असतात आणि या जगातली सुख-दु:खे अनुभवण्यासाठी उत्क्रांतीत आपल्याला अपघाताने मिळतात. हे जे सुख-दु:खाचे देणेघेणे असते त्याबद्दलची ओवी म्हणते, ‘उभ्याउभ्याच झोपत असे। जागेपणी न वेगळा भासे। त्या घोडय़ासारखेच असे। हे देणेघेणे।। ’ हा घोडा म्हणजे मूळ चैतन्य असावा तो जागेपणाची झोपल्याची दोन रूपे दाखवतो. इथे मागच्या लेखात म्हटले तसे कोणालाच प्रवेश नाही. बाहेर दाराशीच थांबायचे, आत शिरायचे म्हटले तर कान, नाक, जीभ, डोळे, त्वचा, चपला जोडे बाहेर काढून ठेवायचे. मग अनुभवायचे तरी काय कसे? आणि हा नियम विष्णू आणि शंकर दोघांना लागू आहे..
मुळात एकच खरोखर। परंतु नामरूपाचे प्रकार।
होते तेही हरिहर। आटले इथे।।
ज्ञानेश्वरांनी देवबाप्पांनाही आटवून टाकले.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is disease of milk component in cow
First published on: 23-07-2013 at 01:01 IST