आधुनिक रसायनशास्त्राची पायाभरणी करणारे म्हणून जे मोजके रसायनशास्त्रज्ञ ओळखले जातात त्यातील एक अग्रणी म्हणून विल्हेम ओस्टवाल्ड यांचे नाव घेतले जाते. हे मूळचे जर्मन शास्त्रज्ञ. जर्मनीतील डॉरपॅट विद्यापीठात व्याख्याता म्हणून चार वर्षे विनावेतन काम केल्यानंतर ते त्याच विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करू लागले. खते व स्फोटके निर्मिती उद्योगात लागणाऱ्या नायट्रिक आम्ल निर्मितीची नावीन्यपूर्ण पद्धत विल्हेम ओस्टवाल्ड यांनी प्रथम शोधून काढली. या पद्धतीमुळे नायट्रिक आम्लाची घाऊक प्रमाणात व किफायतशीर किमतीत निर्मिती करणे सहज शक्य झाले. या नव्या पद्धतीचा शोध लागेपर्यंत नायट्रिक आम्लाची निर्मिती प्रयोगशाळेच्या वापरापुरतीच मर्यादित होती. या पद्धतीचे स्वामित्व हक्क मिळविण्यास त्यांनी अर्ज केला, परंतु लालफितीच्या कारभारामुळे प्रत्यक्ष ते हक्क मिळण्यासाठी त्यांना सहा वर्षे वाट बघावी लागली. भौतिकी-रसायन शास्त्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात विल्हेम ओस्टवाल्ड यांनी मूलभूत संशोधन केले आहे; जसे की उत्प्रेरकांचा वापर, रंगनिर्मिती, विष्यंदता मापनाचे उपकरण, इत्यादी. विरलीकरणाचा नियमही त्यांनी शोधून काढला.
मोल या शब्दाला मराठीत अर्थ वेगळा आहे. परंतु, विज्ञानाच्या संदर्भात ‘मोल’ हे रेणुभार मोजायचे एकक आहे. रसायनशास्त्रातील ‘मोल’ या अतिशय महत्त्वाच्या संकल्पनेचा उद्गाता म्हणून ते ओळखले जातात. या संकल्पनेवर आधारित रसायनांची तीव्रता लिहिण्याची पद्धती पुढे विकसित झाली.
आंतरराष्ट्रीय अणुभार संस्थेचे ते निर्वाचित सदस्य होते. वैज्ञानिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींना जागतिक महायुद्धाची झळ बसली. त्यात विल्हेम ओस्टवाल्ड हेही होते. केवळ ते मूळ जर्मनीतील असल्यामुळे पहिल्या जागतिक महायुद्धात पत्रव्यवहारात झालेल्या दिरंगाईचे कारण पुढे करून त्यांचे आंतरराष्ट्रीय अणुभार संस्थेचे सदस्यत्व संपुष्टात आणले गेले. विज्ञान संशोधन कार्याबरोबरच त्यांनी तत्त्वज्ञानावरही विपुल लेखन केले. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर स्थापन झालेल्या जागतिक शांतता चळवळीच्या कार्यातही ते सक्रिय होते.
उत्प्रेरके व रासायनिक अभिक्रियांची गती या संशोधन कार्याबद्दल १९०९ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आले. या पारितोषिकाची रक्कम त्यांनी संशोधन व जागतिक शांततेसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या कार्यासाठी वाटून दिली. नोबेल पारितोषिक मिळविणारे अरहेनियस, वॅन्ट हॉफ, नेर्स्ट हे तीन शास्त्रज्ञही त्यांचेच शिष्य.
– प्रा. लुम्बिनी जोशी
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
बीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – आसामी
प्रसिद्ध असमिया कादंबरीकार, सर्जनशील पत्रकार, प्रतिभासंपन्न कवी बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांना १९७९ चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९६३ ते १९७२ या कालावधीत प्रकाशित भारतीय भाषेतील सर्वश्रेष्ठ सर्जनात्मक साहित्य म्हणून आसामी कादंबरी ‘मृत्युंजय’साठी समर्पित करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे ते पहिले आसामी लेखक आहेत.
बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्म आसाममधील सिबसागरजवळील एका चहाच्या बागेत, एका अगदी गरीब कुटुंबात, १४ ऑक्टोबर १९२४ रोजी झाला. अक्षरओळख इथेच झाली. अनेक वेळा उपाशीपोटीच त्यांना शाळेत जावे लागे. वयाच्या १३ व्या वर्षी, १९३७ मध्ये ते जोरहाट सरकारी शाळेत दाखल झाले. शालेय वयातच कविता, कथालेखनाला सुरुवात झाली. १९४१ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. जोरहाट हे त्या काळी साहित्यिक कार्यक्रमांचे केंद्र होते. अनेक थोर साहित्यिक तिथे येत असल्याने छोटय़ा बीरेंद्रला त्यांचा भरपूर सहवास मिळाला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ते सहभागी झाले. शेतकऱ्यांची दयनीय स्थिती, देशाचा स्वातंत्र्यसंग्राम, दिग्बोई येथील तेलाच्या मजुरांचा संप हे सगळे त्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले. ही सारी परिस्थिती आणि स्वत: अनुभवलेली गरिबी बरे-वाईट अनुभव हे सारे त्यांच्या लेखनात व्यक्त होत राहिले. कलकत्ता इथे येऊन त्यांनी वाङ्मयीन नियतकालिके, मासिकांचे इंग्रजी साप्ताहिक, दैनिकांचे संपादन कार्य सुरू केले. ‘वन्ही’ ही आसामी साहित्य पत्रिका, दैनिक असमिया, रामधेनू आणि नंतर सर्वाधिक खपाचे ‘नवयुग’चे संपादन केले. याच काळात त्यांची डॉ. राममनोहर लोहिया यांच्याशी मैत्री झाली आणि ते समाजवादी आंदोलनाशी जोडले गेले. याच काळात त्यांना ‘आसामी साहित्यातील विनोद आणि उपहास’ या विषयावर गुवाहाटी विश्वविद्यालयाने डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली.महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान व जीवनविषयक मूल्ये यांचे ते कडवे पुरस्कर्ते होते. जयप्रकाश नारायण यांच्या विचारसरणीचाही त्यांच्यावर प्रभाव होता.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com