कार्ल श्वार्झशील्ड या जर्मन संशोधकाने १९१६ साली आइन्स्टाइनच्या व्यापक सापेक्षता सिद्धांताच्या आधारे, अतिघन वस्तूचे गुरुत्वाकर्षण प्रकाशाला आपल्या कब्जात ठेवण्याइतके तीव्र असू शकेल हे दाखवून दिले. तसेच किती अंतरापर्यंत ही अतिघन वस्तू प्रकाशाला आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या कब्जात ठेवू शकेल, याचेही त्याने गणित मांडले. या अतिघन वस्तूला ‘कृष्णविवर’ म्हणतात व हे विशिष्ट अंतर त्या कृष्णविवराचे ‘घटना क्षितिज’ (इव्हेन्ट होरायझन) म्हणून ओळखले जाते. घटना क्षितिजाच्या आत घडणारी कोणतीही घटना आपल्याला दिसू शकत नाही. कृष्णविवरातून कोणत्याही प्रकारचे प्रारण बाहेर पडू शकत नसल्यामुळे कृष्णविवराचा शोध घेणे हे कठीण ठरते.

कृष्णविवराच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा हंस तारकासमूहातील ‘सिग्नस क्ष-१’ या क्ष किरणांच्या स्रोतातून मिळाला. सिग्नस क्ष-१ या स्रोताचा शोध १९६५ साली लागला. या स्रोताच्या ठिकाणाशी सूर्याच्या तुलनेत सुमारे पंधरापट वस्तुमान असणारा, निळ्या रंगाचा एक प्रचंड तारा वसलेला आहे. १९७१ साली चार्ल्स बोल्टन या अमेरिकन खगोलशास्त्रज्ञाने वर्णपटशास्त्राच्या साह्याने या ताऱ्याचा अभ्यास केला. या ताऱ्याच्या वर्णपटात कालानुरूप होणारे बदल हे या ताऱ्याला एखादा अदृश्य जोडीदार असून, ही जोडी एका ठरावीक बिंदूभोवती ५.६ दिवसांत प्रदक्षिणा घालीत असल्याचे दर्शवत होते. हा अदृश्य तारा सूर्याच्या तुलनेत किमान सहापटींहून अधिक जड असण्याची शक्यता दिसून येत होती. इतके प्रचंड वस्तुमान असूनही अदृश्य असणारा हा तारा कृष्णविवराच्या स्वरूपात असल्याची शक्यता व्यक्त केली गेली. त्यानंतर ‘सिग्नस क्ष-१’ स्रोताच्या तीव्रतेतील बदलांचा अधिक अभ्यास केला गेला. यावरून हे कृष्णविवर आपल्या गुरुत्वाकर्षणाद्वारे, निळ्या ताऱ्याकडील पदार्थ खेचून घेत असल्याचे स्पष्ट झाले. हे पदार्थ इतक्या प्रचंड गतीने कृष्णविवराकडे खेचले जात आहेत, की त्यांचे तापमान प्रचंड वाढून त्यांतून मोठय़ा प्रमाणात क्ष-किरणांचे उत्सर्जन होत आहे.

या पहिल्यावहिल्या संभाव्य कृष्णविवराच्या शोधानंतर क्ष किरणांच्या अशाच स्रोतांच्या उगमाशी असणाऱ्या आणखी संभाव्य कृष्णविवरांचाही शोध लागला. किंबहुना अनेक दीíघकांच्या केंद्रस्थानी सूर्याच्या लक्षावधीपट वस्तुमानाची कृष्णविवरे अस्तित्वात आहेत. अलीकडेच ‘इव्हेन्ट होरायझन टेलिस्कोप’ या पृथ्वीवरील रेडिओदुर्बणिींच्या जाळ्याद्वारे, कन्या तारकासमूहातील एका दीíघकेच्या केंद्राशी असलेल्या अशा अतिप्रचंड कृष्णविवराची प्रतिमा मिळवण्यात संशोधकांना यश आले आहे.

– डॉ. वर्षां चिटणीस मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.orgc