जस्ताचे उपयोग

पितळ आणि ब्राँझ आणि अन्य संमिश्राची निर्मिती याकरिता केला जातो.

जस्ताचा वापर गॅल्व्हॉनीकरण (जस्तविलेपन), पितळ आणि ब्राँझ आणि अन्य संमिश्राची निर्मिती याकरिता केला जातो. जस्त क्षरणरोधी असल्यामुळे अन्य धातू (मुख्यत: लोखंड, पोलाद) गंजण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जस्ताचा मुलामा वस्तूंवर देतात. जस्त हे लोखंड/ पोलाद यांच्यापेक्षा अधिक क्रियाशील असल्याने हवेतील ऑक्सिजनबरोबर त्याची क्रिया होऊन ते गंजते. जस्त गंजल्यामुळे लोखंड आणि पोलादाच्या वस्तूंवर जस्त-ऑक्साइड आणि जस्त-काबरेनेट यांचा संरक्षक थर बनतो. अशा थरावर ओरखडा पडला तरी आतील लोखंड सुरक्षित राहते. परंतु जस्त पूर्णपणे गंजून गेल्यानंतर मात्र लोखंड किंवा पोलाद गंजते. एखाद्या वस्तूचे गॅल्व्हॉनीकरण करताना विद्युत अपघटन प्रक्रियेचा वापर करतात किंवा वस्तू वितळलेल्या जस्ताच्या द्रावणात बुडवितात. कुंपणाच्या तारा, लोखंडी पूल, विजेचे खांब, छपरांसाठी वापरण्यात येणारे पत्रे, मोटारींचे भाग इ. वस्तू गॅल्व्हॉनीकरण प्रक्रियेने संरक्षित करतात; जीआयचे पत्रे असे आपण ऐकले असेलच!

समुद्राच्या पाण्यात वापरले जाणारे धातू सुरक्षित राहण्यासाठी जस्त वापरतात. जसे, जहाजाचे पोलाद सुरक्षित ठेवण्यासाठी पोलादी सुकाणूला जस्ताची चकती लावतात. श्रवणयंत्रात वापरण्यात येणाऱ्या विद्युतघटातही (जस्त-एअर बॅटरी) जस्त असते.

जस्तयुक्त संयुगांचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. झिंक (जस्त) ऑक्साइड हे पांढरा रंग म्हणून तसेच रबर उद्योगात उत्प्रेरक म्हणून वापरतात. झिंक सल्फाइड हे दिप्तीमान रंगद्रव्य मनगटी घडय़ाळे, दूरचित्रवाणीचे पडदे, दिप्तीमान रंग यांत वापरतात. झिंक-सल्फेट रंग आणि रंगद्रव्ये यात एक रसायन म्हणून वापरतात. झिंक-डायथायोकार्बानेट कवकनाशक (fungicide) म्हणून वापरतात. जस्त प्रति ऑक्सिडीकारक मानले जाते आणि जीवनसत्त्वे, खनिजे यांवर दिल्या जाणाऱ्या पूरक औषधांमध्ये झिंक-ऑक्साइड किंवा झिंक-अ‍ॅसिटेट ही संयुगे असतात.

मनुष्य, प्राणी आणि काही सूक्ष्मजीव यांना सूक्ष्म प्रमाणात जस्त गरजेचे असते. सु. ३०० विकरांची काय्रे जस्ताअभावी घडून येत नाहीत. विकसनशील देशांतील बालकांमध्ये अतिसारावर इलाज करण्यासाठी जस्त पूरक औषधांचा वापर हा स्वस्त आणि रामबाण उपाय मानला जातो. उन्हाळ्यात तसेच थंडीत त्वचा नीट राहावी म्हणून त्वचेच्या क्रीममध्ये जस्त-ऑक्साइड मिसळतात. तोंडाची दरुगधी टाळण्यासाठी टुथपेस्ट किंवा माऊथ वॉश यांत जस्तयुक्त संयुगे मिसळतात, तर कोंडाप्रतिबंधक शँपूमध्ये जस्त पायरीथिऑन मिसळतात. अतिरिक्त जस्त शरीराला घातक असते.

– विजय ज्ञा. लाळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Zinc chemical element

ताज्या बातम्या