13 August 2020

News Flash

व्यक्तिमत्त्व विषारी आणि पोषक

मन कॉम्प्युटरसारखं काम करू लागतं आणि आपण त्याला प्रवृत्ती फीड करत राहतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

रास्त विचारांचा माणूस आणि बुद्धिनिष्ठ माणूस यातला फरक आपण समजून घेतलाच पाहिजे. रास्त विचार करणारा माणूस कधीही केवळ बुद्धिनिष्ठ नसतो, कारण आयुष्यात बुद्धिनिष्ठ आणि अतार्किक अशा दोन्ही गोष्टी असतात हे त्याला अनुभवाने समजलेलं असतं. आयुष्य म्हणजे तर्क आणि भावना दोन्ही असतं हे त्याला समजलेलं असतं. असा माणूस समंजस असतो. बुद्धिनिष्ठ माणूस कधीच समंजस नसतो.

माझ्यात आळशीपणा आणि पळपुटेपणा अंगभूतच आहे. एक तर माझ्यात शक्तीच नाहीये, असं मला वाटतं किंवा शक्ती वाटत असली तरी पूर्णपणे झोकून देणं मला अवघडच जातं. मला वाटतं हे कुठेतरी असतं आणि मग तुमच्या बायो-कॉम्प्युटरचा भाग होऊन जातं. मन कॉम्प्युटरसारखं काम करू लागतं आणि आपण त्याला प्रवृत्ती फीड करत राहतो. त्या तिथे जमा होत जातात आणि हळूहळू खोलवर अडकतात. व्यक्तिमत्त्वांचं वर्गीकरण दोन प्रकारांत करता येईल. एक म्हणजे मानसशास्त्रज्ञ म्हणतात, त्याप्रमाणे टी-पर्सनॅलिटी म्हणजेच टॉक्सिक अर्थात विषारी आणि दुसऱ्या प्रकाराला ते म्हणतात- नरिशिंग अर्थात पोषक.

विषारी व्यक्तिमत्त्व नेहमीच सगळ्या गोष्टींकडे नकारात्मक दृष्टीने बघतं. या लोकांच्या मते सगळं जगच निराशाजनक, दु:खी असतं. अगदी सुंदर चेहऱ्यांमागेही हे विषारी व्यक्तिमत्त्व लपलेलं असतं. परिपूर्णतावादी माणूस विषारी व्यक्तिमत्त्वाचा असतो. परिपूर्णतावादी माणसामध्ये तुम्हाला काही चुकीचं सापडणार नाही, पण परिपूर्णतावाद ही संकल्पनाच मुळी चुका, त्रुटी शोधणारी आहे. परिपूर्णतेचा ध्यास घेतलेल्या माणसात तुम्ही काहीच चूक शोधू शकत नाही. पण खरं तर परिपूर्णता हे त्याचं उद्दिष्ट असायला नको; परिपूर्णता हे साधन आहे. हा माणूस चुका, त्रुटी बघत राहतो, काय नाही आहे ते शोधत राहतो. परिपूर्णता हेच उद्दिष्ट ठेवायचं आणि सगळ्या गोष्टींची आदर्शाशी तुलना करून टीका करत राहायची. विषारी व्यक्तिमत्त्व नेहमी काय नाहीये याचा विचार करत राहतं, काय आहे याकडे बघतच नाही, त्यामुळे साहजिकच असमाधानी असतं. विषारी व्यक्तिमत्त्वाचा माणूस स्वत:चं अस्तित्व विषारी करून टाकतो, एवढंच नाही- तो विष पसरवत राहतो. हे वारशाने येऊ शकतं. तुमचं बालपण जर आयुष्याकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांसोबत गेलं असेल तर हे होऊ शकतं. म्हणजे हा दृष्टिकोन कदाचित चमकदार शब्द, सुंदर भाषा, आदर्श, स्वर्ग, देव, धर्म, आत्मा वगैरेंच्या मागे लपलेलाही असू शकतो; हे लोक सुंदर शब्द वापरतात पण त्यांचा प्रयत्न केवळ हाच असतो.. ते दुसऱ्या जगाविषयी बोलतात, ते केवळ या जगावर टीका करण्यासाठीच. त्यांना दुसऱ्या जगाशी काही देणं-घेणं नसतं. त्यांना संतांमध्ये रस नसतो, पण फक्त बाकीच्यांना पापी ठरवण्यासाठी ते संतांबद्दल बोलतात.

ही अत्यंत रोगट प्रवृत्ती आहे. ते म्हणतील, ‘देवासारखे व्हा’ पण त्यांना देवामध्ये रस नसतो. केवळ तुम्हाला तुच्छ लेखण्यासाठी ते हे हत्यार वापरतात. तुम्ही देव काही होऊ शकत नाही, बळी मात्र ठरता. ते सारखे तुमच्यावर टीका करत राहतात. ते मूल्यं, नैतिकता, कर्मठ प्रवृत्ती निर्माण करतात. ते नीतिमत्तेचे प्रशासक होतात, विवेचक होतात. असे लोक सर्वत्र असतात. हे लोक शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, कुलगुरू, धर्मगुरू होतात. कारण, यामुळे ते टीका करू शकतात. टीकेचा आनंद मिळणार असेल तर ते बाकी सगळ्याचा त्याग करायलाही तयार असतात. ते अनेक ठिकाणी लपलेले आहेत आणि ते जे करतात, ते तुमच्या भल्यासाठीच. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याविरुद्ध बोलताही येत नाही. त्यांचा वारसा महान आहे. त्यांनी संपूर्ण इतिहासावर वर्चस्व गाजवलं आहे.

हे लोक लगेचच शासक होऊन जातात. त्यांची ही विचारधारा त्यांना वर्चस्व गाजवण्यात मदत करते. ते नेहमी बुद्धिनिष्ठ बोलतात. बुद्धिनिष्ठता हाही विषारी व्यक्तिमत्त्वाचाच भाग आहे. ते युक्तिवाद करतात. युक्तिवादात त्यांना हरवणं कठीण असतं. ते कधीच रास्त किंवा समंजस नसतात, पण कायम बुद्धिनिष्ठ मात्र असतात. रास्त विचारांचा माणूस आणि बुद्धिनिष्ठ माणूस यातला फरक आपण समजून घेतलाच पाहिजे. रास्त विचार करणारा माणूस कधीही केवळ बुद्धिनिष्ठ नसतो, कारण आयुष्यात बुद्धिनिष्ठ आणि अतार्किक अशा दोन्ही गोष्टी असतात हे त्याला अनुभवाने समजलेलं असतं. आयुष्य म्हणजे तर्क आणि भावना दोन्ही असतं हे त्याला समजलेलं असतं.

असा माणूस समंजस असतो. बुद्धिनिष्ठ माणूस कधीच समंजस नसतो. तो आयुष्यावर तर्क लादत राहतो. तर्क नेहमी परिपूर्ण असतो; आयुष्य कधीच परिपूर्ण असू शकत नाही. बुद्धिनिष्ठ माणूस केवळ आदर्शाकडे बघतो आणि आयुष्याला जबरदस्तीने तिकडे वळवू पाहतो. तो कधीच आयुष्याच्या आतमध्ये, आयुष्यातल्या वास्तवाकडे बघत नाही. दुसऱ्या प्रकारचं व्यक्तिमत्त्व- पोषक व्यक्तिमत्त्व हे पूर्णपणे वेगळं असतं. त्यात कोणतेही आदर्श नसतात. या व्यक्तिमत्त्वाची माणसं केवळ आयुष्याच्या आतमध्ये बघतात आणि त्यातलं वास्तवच आदर्श निश्चित करतं. हे लोक खूप समंजस असतात. ते कधीच परिपूर्णतावादी नसतात; ते संपूर्णतावादी असतात पण परिपूर्णतावादी कधीही नसतात. आणि

ते नेहमी गोष्टीच्या चांगल्या बाजूकडे बघतात. पोषक व्यक्तिमत्त्व नेहमीच आशावादी, तेजस्वी, साहसी, विश्वास ठेवणारं आणि टीका टाळणारं असतं. या व्यक्तिमत्त्वाचे लोक कवी, चित्रकार, संगीतकार होतात.

पोषक व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती संत झाली, तर ती खरी संत असते. विषारी व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती संत झाली तर तो ढोंगी संत असतो. पोषक व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती पिता झाली तर तो खरा पिता असतो, आई झाली, तर ते खरोखर मातृत्व असतं. विषारी व्यक्तिमत्त्वांतून दांभिक आई-बाप तयार होतात. ते आई-बाप होतात मुलांचं शोषण करण्यासाठी, छळण्यासाठी, वर्चस्व गाजवण्यासाठी, मालकी दाखवण्यासाठी. मुलाला दाबून त्यांना शक्तिशाली वाटतं. विषारी व्यक्तिमत्त्वाचे लोक बहुसंख्येने असतात, त्यामुळे कदाचित हे वारशाने येतं हे म्हणणं बरोबर ठरेल. पण एकदा का तुम्हाला याची जाणीव झाली की विषारी व्यक्तिमत्त्वापासून पोषक व्यक्तिमत्त्वापर्यंतचा प्रवास अगदी सोपा आहे.

काही गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला आळस जाणवत असेल, तर त्याला आळशीपणा म्हणू नका. तुमचा स्वभाव काय म्हणतोय ते ऐका; कदाचित तेच तुमच्यासाठी योग्य असेल. यालाच मी समजूतदारपणा म्हणतो. तुम्ही काय करू शकता? जर तुम्हाला आळस आला असेल, तर तुम्ही आळसाने वागलं पाहिजे. त्याच्याविरोधात काही ठरवणारे तुम्ही कोण? तुम्ही त्याच्यावर विजय तरी कसा मिळवू शकाल? या लढय़ातही तुम्ही आळशीपणाच कराल. मग कोण जिंकेल? तुम्ही सातत्याने हरत राहाल आणि मग उगाच तुम्हाला दु:खी वाटत राहील.

वास्तववादी राहा. तुमच्या अस्तित्वाचं ऐका. प्रत्येकाचा स्वत:चा असा वेग असतो. फार थोडे लोक क्रियाशील, उतावळे असतात; त्यातही काही चुकीचं नाही. त्यांना तसं चांगलं वाटत असेल, तर ते त्यांच्यासाठी चांगलं आहे.

आणि तुम्ही अमुक केलंच पाहिजे वगैरे आदर्श निर्माण करू नका. ‘हे केलं पाहिजे’ असं काही ठेवूच नका. यामुळे मानसिक विकृती येते. पछाडल्यासारखं होतं. ‘हे केलं पाहिजे’ हा नियम तुमच्यावर टीका करत राहतो, तुम्हाला कशाचा आनंद घेऊ देत नाही. आनंद लुटा! हा नियम नष्ट करा. तुम्ही जे काही करू शकाल, ते करा; काही करू शकत नसाल, तर ते स्वीकारा. हेच तुम्ही स्वत: आहात आणि तुम्ही इथे आहात ते स्वत: म्हणून जगण्यासाठी, दुसरे कोणीतरी म्हणून जगण्यासाठी नाही. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुमचं विषारी व्यक्तिमत्त्व पोषक व्यक्तिमत्त्व होतंय. मग तुम्ही आणखी आनंद लुटू शकाल, तुम्ही अधिक प्रेम कराल आणि अधिक चिंतनशील व्हाल.

खरं म्हणजे आळशी माणसासाठी चिंतनशील होणं सक्रिय माणसाच्या तुलनेत सोपं आहे. म्हणूनच तर सगळं पौर्वात्य जग आळशी झालं आहे- त्यांनी खूप ध्यान केलं. ध्यान ही एक प्रकारची निष्क्रियता आहे. क्रियाशील माणसाला अस्वस्थ वाटतं. केवळ शांत बसून राहणं त्याच्यासाठी सर्वात कठीण असतं. काहीच न करणं क्रियाशील माणसासाठी सर्वात अवघड असतं.

तुमच्या अस्तित्वाला मानवत असेल त्याप्रमाणे आनंद घ्या आणि हालचाल करा- नियम नकोत, आदर्श नकोत, कारण ते तुमच्यात विष भरतील. सखोल आशेने आयुष्याकडे बघा. ते खरंच सुंदर आहे. त्याकडे फक्त बघा, परिपूर्णतेची आस लावून घेऊ नका. गोष्टी परिपूर्ण असतील तरच त्यांचा आनंद लुटावा असा विचार करू नका; नाहीतर तुम्हाला कधी आनंद मिळणारच नाही.

विषारी व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीला देव भेटला, तरी ती त्याच्यात लगेच चुका शोधेल. म्हणून तर देव लपून बसला आहे- विषारी व्यक्तिमत्त्वाच्या लोकांमुळे. तो प्रकट होतो पोषक व्यक्तिमत्त्वांपुढे, विषारी व्यक्तिमत्त्वांपुढे तो कधीच येत नाही. जे त्याच्याकडून पोषण घेऊ शकतात, एवढंच नाही, तर त्याचं पोषण करू शकतात, त्यांनाच तो दिसतो. तेव्हा मोकळे व्हा, आनंद लुटा आणि स्वीकारा, मग सगळ्या समस्या नाहीशा होतील.

ओशो, द पॅशन फॉर इम्पॉसिबल

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

 भाषांतर – सायली परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2018 4:57 am

Web Title: article from the passion for the impossible book by osho
Next Stories
1 अनुकंपा
2 अंत:स्थ संपदा हाच स्वर्ग
3 स्वत:ला समजून घेणं..
Just Now!
X