डॉ. विनोदकुमार पॉल

निती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य

‘कोविड-१९’ किंवा करोनावर एक नव्हे तर दोन लशींचे उत्पादन भारतात झाले आणि त्यानंतर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लसीकरणाला सुरुवात होऊन, पहिल्या अवघ्या २० दिवसांत ४६ लाखांहून अधिक जणांना लस टोचण्याचा वेगवान पल्ला भारताने गाठला. जरी प्रत्येक औषधाला दुष्परिणाम असले तरी डॉक्टर या नात्याने लस घेतल्यानंतर काही त्रास झाला नाही हा स्वानुभव आहे. लढाई सुरू तर झालेली आहे. आता प्रत्येक देशवासीयानेही निष्ठापूर्वक, विश्वासपूर्वक साथ दिलीच पाहिजे..

करोना महासाथीने गेल्या वर्षभरात अवघ्या जगाला ग्रासून, झाकोळून टाकले आहे. ही साथ एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये इतक्या झपाटय़ाने पसरली की, आपल्या सरकारपुढे आणि शास्त्रज्ञांपुढे हा प्रसार थांबवण्याच्या समस्येने मोठय़ा आव्हानासारखे रूप धारण केले.

मात्र भारतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कित्येक महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आणि मग आपले आरोग्य कर्मचारी, उद्योजक, अन्य प्रकारच्या आघाडय़ांवर अत्यावश्यक कर्मचारी (फ्रंटलाइन वर्कर्स) यांनी मिळून या साथीचा सामना केला. याचा परिणाम आज सर्वाच्या समोर आहे. तो हाच की, आपण या महासाथीला बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आणू शकलेलो आहोत. नीट लक्षपूर्वक पाहिलेत तर लक्षात येईल की, भारतातील प्रत्येक एक लाख लोकसंख्येचा विचार करता संक्रमण-दर आणि मृत्युदर हे आपण कमी करू शकलेलो आहोत.

आपल्या शास्त्रज्ञांनी, रात्रंदिवस काम करून करोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आणि जनतेला या रोगाच्या अधिक जीवघेण्या रूपापासून वाचविण्यासाठी लसदेखील विकसित केलेली आहे. १६ जानेवारी २०२१ पासून आपण एकच नव्हे, तर दोन-दोन लशींचा पर्याय अख्ख्या भारतभरातील आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यास सुरुवात केली.

सरकारने या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यामध्ये तीन कोटी आरोग्य व सफाई कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी आदींना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. हे सारेच, ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ या गटात मोडतात आणि जणू आपल्या जवानांनी सीमेवर राहून शत्रूच्या धोक्यापासून आपले संरक्षण करावे, त्याचप्रमाणे हे सारे ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ करोनापासून स्वत:चे तसेच इतरांचे संरक्षण करीत आहेत.

या लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी देशभरातील जवळपास दोन लाख जणांना लस टोचण्यातही आली. माझे नशीब मोठे, म्हणून मी एक डॉक्टर असल्यामुळे मलाही लस मिळाली आहे. लसीकरण केंद्रामधील ज्या बूथवर लस टोचून घेण्यासाठी माझा क्रमांक आला, तिथे उपलब्ध असणारी लस ही ‘भारत बायोटेक’ने उत्पादन केलेली ‘कोव्हॅक्सिन’ होती. मला सांगावयास अत्यंत आनंद होतो की, भारतात उत्पादन झालेल्या या लशीमुळे मला कोणताही दुष्परिणाम किंवा ‘साइड इफेक्ट’ झालेला नाही. मी आधी होतो, तितकाच पूर्णपणे ‘फिट’ आहे. याचप्रमाणे सीरम इन्स्टिटय़ूटद्वारे उत्पादन झालेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लसदेखील पूर्णपणे सुरक्षित आहे.

अर्थात, कोणत्याही लशीचा -किंबहुना कोणत्याही औषधाचा- थोडय़ाफार प्रमाणात, नगण्य का होईना पण काहीएक दुष्परिणाम होतच असतो. जगभरात अशी एकही लस अथवा असे एकही औषध नाही, की ज्याचा दुष्परिणाम नाही. लस घेणाऱ्याला हलका ताप, शरीरात जेथे इंजेक्शनची सुई टोचली गेली आहे त्याजागी काहीसे दुखणे, थोडीशी खाज येणे आदी त्रास होऊ शकतो. काही लोकांमध्ये हे दुष्परिणाम थोडे अधिक दिसून येतात, पण त्याहीसाठी आपण आधीपासूनच योग्य ती पावले उचललेली आहेत.

त्याचसाठी, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपण ‘एईएफआय’ (अ‍ॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन) पथकांची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचे परिस्थितीवर अहोरात्र लक्ष आहे. आजवरच्या अनेक लशी या लहान बालकांनाच दिल्या जात असत, त्यामुळे  ‘एईएफआय’च्या या पथकांमध्ये पूर्वी बालरोगतज्ज्ञ डॉक्टरच असत. पण आता करोनाची लस मोठय़ांना दिली जात असल्यामुळे हृद्रोगतज्ज्ञ, मेंदूविशेषज्ञ, श्वासरोगतज्ज्ञ आदी प्रकारच्या डॉक्टरांनाही या पथकांमध्ये सहभागी करून घेण्यात आलेले आहे. या प्रत्येक पथकामधील प्रत्येक व्यक्तीला, कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम तात्काळ ओळखून त्याचे निवारण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

आणखी एक गोष्ट मी येथे मोठय़ा आनंदाने नमूद करू इच्छितो. ती म्हणजे, भारतामध्ये लवकरच -अगदी येत्या काही महिन्यांतच- आणखीही तीन किंवा चार प्रकारची करोना-लस उपलब्ध होऊ शकणार आहे.

आपला लसीकरण कार्यक्रम सध्या दोनच लशींनिशी सुरू करण्यात आला. पण येत्या काही काळात नवनव्या लशीदेखील त्यात जोडल्या गेल्यामुळे आपण वेगाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि लवकरच करोना महासाथीचा फैलाव आणि या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंना जवळपास शून्यावर आणणे हे दोन्ही आपण शक्य करू शकतो.

मी आणखीही एक गोष्ट येथे नमूद करू इच्छितो. ही लस अगदी कमीत कमी वेळात संशोधित आणि उत्पादित झालेली आहे हे खरेच, परंतु विश्वास ठेवा की, आपल्या शास्त्रज्ञ आणि नियामकांनी या लशी सुरक्षित आणि प्रभावी असल्याची खात्री करूनच त्यांना मंजुरी दिलेली आहे. भारत हा पहिल्या अवघ्या २० दिवसांमध्ये ४६ लाखांहून अधिक कोविड-१९ लसीकरणाची पातळी गाठणारा जगभरातील पहिला सर्वात वेगवान देश ठरलेला आहे.

अन्य काही देशांमध्ये लसीकरणाचा ६७वा दिवस चालू होता, पण भारताने तर कोविड-१९ लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारी २०२१ पासूनच केली.

आपल्या वैज्ञानिकांनी आणि नियंत्रकांनी त्यांच्या वाटय़ाचे काम जर इमानेइतबारे, निष्ठापूर्वक केलेले आहे, तर आता देशातील जनतेचीही ही जबाबदारी ठरते की पूर्ण विश्वासानेच ही लस टोचून घ्यावी, जेणेकरून आपण आपल्या देशाला करोना महासाथीपासून मुक्त करू शकू.

माझी सर्वच देशवासीयांना हीदेखील आग्रही विनंती आहे की, जोवर आपण सर्वांपर्यंत लस पोहोचवू शकत नाही, तोवर करोनासंदर्भातील आरोग्य-निर्देश सर्वानीच पाळत राहावेत. मास्क लावणे, वारंवार हात धुणे, इतरांपासून किमान दोन मीटरचे अंतर पाळणे किंवा गर्दीच्या ठिकाणी ये-जा टाळणे हे सारे प्रत्येकाला पाळावेच लागेल.

करोनासारख्या महासाथीशी सुरू झालेली ही लढाई सरकार एकटे जिंकू शकत नाही. त्यासाठी सर्वाना एकत्र यावे लागेल. प्रत्येकाला आपापले योगदान इमानेइतबारे तसेच निष्ठा आणि विश्वास राखूनच द्यावे लागणार आहे.