समाजात लोकांचे छोटे छोटे विचित्र अनुभव कदाचित दत्तक मुलांच्या आयुष्यात वादळं निर्माण करू शकतात. अश्विनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिचं आई-बाबांसोबतचं घट्ट नातं, त्यांचे संस्कार आणि तिचं व्यक्तिमत्त्व यामुळे तिच्या आयुष्यात वादळं आलीच नाहीत. प्रत्येक जण थोडा संवेदनशील राहिला तर दत्तक प्रक्रियेतून आलेलं प्रत्येक मूल विचित्र, वेगळ्या अशा अनुभवातून जाणारच नाही.

अश्विनी, आजची एक संवेदनशील गायिका. दत्तक प्रक्रियेतून घरी आल्यापासून आजपर्यंतचा तिचा प्रवास एक आदर्शवत आहे. मुळात अश्विनी एक समंजस, शांत आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची आहे, त्याचबरोबर तिचं आई-बाबांसोबतचं दृढ नातं, त्यांचा एकमेकांवरचा विश्वास आणि दत्तक प्रक्रियेविषयी त्यांनी लहानपणापासून तिच्यासोबत साधलेला संवाद, यामुळे अश्विनीला आजपर्यंत कुठल्याही भावनिक ओढाताणीचा सामना करावा लागला नाही. ज्या वेळी असे काही छोटे छोटे प्रसंग आले त्या वेळेस आई-बाबांसोबतचा तिचा संवाद नेहमीच तिला यातून बाहेर यायला मदत करतो. आज ती स्वतंत्रपणे पुण्यात राहून स्वत:चे संगीताचे वर्ग घेते. तिला वाटतं, दत्तक प्रक्रियेविषयी समाज प्रबोधनाची नितांत गरज आहे आणि म्हणून अश्विनी माझ्यासोबत काम करतेय, त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा लेख तिच्या प्रवासाबद्दल..

अश्विनीच्या आई-बाबांशी बोलताना तिची आई २६ वर्षे मागे गेली. म्हणाली, ‘‘अश्विनी घरी आली तो क्षण आजही आम्हाला तितकाच आनंद देतो. लग्नाच्या पाच वर्षांत मूल झालं नाही. आम्ही दोघांनी ठरवलं, आपलं बाळ हे दत्तक प्रक्रियेतून घरी येऊ  दे. आम्ही मुंबईमध्ये राहायचो, तिथे बऱ्याच संस्थांमध्ये संपर्क साधायचा प्रयत्न केला, परंतु गोष्टी काहीच पुढे जाईनात. जुलै १९९० मध्ये आम्ही पुण्याला आलो, लगेचच ‘श्रीवत्स’ या संस्थेविषयी माहिती मिळाली आणि आम्ही ऑक्टोबरमध्ये श्रीवत्सला भेट दिली. तिथे आमचं पिल्लू आहे हे नक्की माहीत होतं, पण कसं ओळखणार होतो? आम्ही बाळांना भेटायला गेलो, त्या वेळेस चार महिन्यांची मैथिली आमच्याकडे बघून हसली आणि लगेच तिने माझ्याकडे झेप घेतली. त्या क्षणाला जाणवलं, आपली अश्विनी तर हीच. खरंच का हे सगळं असं सहजी जुळून येतं? १६ ऑक्टोबर, दिवाळीचा वासुबारसेचा दिवस होता तो! न्यायालय बंद असल्याने त्या दिवशी दत्तक प्रक्रिया सुरू होऊ  शकणार नव्हती. थोडा वेळ अगतिक व्हायला झालं; परंतु संस्थेने आम्हाला सांगितलं, ‘तुम्ही आज तुमच्या लेकीला घेऊन जा.’ तो आमच्या आयुष्यातला परमोच्च आनंदाचा क्षण होता. ती दिवाळी आमच्या आयुष्यातील खास दिवाळी झाली.’’

अश्विनीचे बाबा आवर्जून सांगतात, ‘‘आपण जेवढं सकारात्मक बघतो, वागतो तेवढय़ाच सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. आम्ही दत्तक प्रक्रियेकडे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं, यात कुठेही समाजात आपली प्रतिष्ठा वाढावी किंवा आम्ही काही तरी महान काम करतोय असा भाव कधीच नव्हता. आमची भावनिक गरज होती म्हणून आम्ही दत्तक प्रक्रियेकडे वळलो. या सकारात्मक दृष्टिकोनाचा एक भाग म्हणजे, अश्विनीला तिच्या आजीनं, आमच्या नातेवाईकांनी आणि समाजानं मनापासून आपलं मानलं.’’

अश्विनीच्या बाबांनी पहिल्या दिवशी आणि सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये, त्यांची उडालेली त्रेधातिरपीट अशा खूप साऱ्या आठवणी सांगितल्या. त्यातील एक आठवण म्हणजे, ‘‘आम्हाला संस्थेने अश्विनीचा खाण्याचा दिनक्रमाचा कागद दिला होता, जो आम्ही सुरुवातीचे काही दिवस काटेकोरपणे पाळत होतो. एक दिवस आम्ही तिला आमच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो, तिथे त्यांना तो कागद दाखवला आणि त्यात काही बदल हवा असेल तर सुचवा अशी विनंती केली. त्यावर ते म्हणाले, ‘हा दिनक्रम ती संस्थेमध्ये होती तेव्हाचा आहे, आता ती घरी आलीय, ती तुमची लेक आहे त्यामुळे तुम्ही तिचा दिनक्रम ठरवायचा, हा कागद आता बाजूला ठेवा.’ असे हे अनुभव आम्हाला जाणीव करून द्यायचे, ‘आमची अश्विनी आता फक्त आमचीच आहे’.’’ हे बोलताना आजही अश्विनीच्या बाबांना गहिवरून येतं. या नात्याला दृढ करण्यासाठी समाजातील अशी संवेदनशील वागणूक नेहमीच मदत करते.

अश्विनीला वयाच्या पाचव्या वर्षी तिच्या आई-बाबांनी दत्तक प्रक्रियेविषयी गोष्टीरूपातून सांगायला सुरुवात केली. अश्विनीला गणपतीबाप्पा खूप आवडायचे. अशीच बाबांनी सांगितलेली एक गोष्ट तिला आठवते, ‘‘अश्विनी, गणपतीबाप्पाकडून ना एक चूक झाली, त्यांनी तुला दुसऱ्याच आईच्या पोटात पाठवलं. त्यांना नंतर त्यांची चूक कळली, ती सुधारण्यासाठी मग बाप्पांनी तुला संस्थेत आणून दिलं आणि आम्हाला कळवलं, तुमचं बाळ या संस्थेमध्ये आहे, लवकर येऊन तिला घरी घेऊन जा. आम्ही लगेच तिथे आलो आणि तू तुझ्या घरी आलीस.’’ अश्विनी म्हणते, ‘‘लहानपणीपण ही गोष्ट मला पटली आणि आजही माझा विश्वास आहे, देवच सगळ्या गाठीभेठी घडवून आणतो.’’

मी अश्विनीला म्हणाले, ‘‘तुला मी नेहमीच सकारात्मक विचार करताना, बोलताना बघते. तुलाही काही अनुभव आले असतील ज्यामुळे तू दुखावली असशील?’’ त्यावर अश्विनी म्हणाली, ‘‘ताई, खरंच अगं मला जास्त अनुभव सकारात्मकच आले आहेत. मुळात मला दत्तक प्रक्रियेविषयी कधी भीती, शंका किंवा त्यावर घरात चर्चा व्हाव्या असं वाटलच नाही. माझ्यासाठी दत्तक पालकत्व आणि मूल हे नातं नैसर्गिकच आहे त्यामुळे मला माझे आई-बाबा हे माझे जन्मदाते आहेत असंच वाटतं. आमच्या घरात खरंतर सगळेच अतिशय हुशार! पण मी मात्र अभ्यासात सर्वसाधारण होते, या गोष्टीचा माझ्या आई-बाबांनी कधीच बाऊ  केला नाही की मला त्याची जाणीव होऊ  दिली नाही. त्यांनी माझी तुलना कधीही कुणाशीही केली नाही, त्यांनी नेहमीच माझ्या गुणांना वाव दिला. घरात सगळं वातावरण संगीतमय, आत्या गायिका, आई गायिका आणि हौशी कलाकार, बाबा संगीताचे गाढे अभ्यासक त्यामुळे मी संगीत लहानपणापासून आवडीने शिकले. माझ्या सगळ्या आवडीनिवडी, शिक्षण, व्यवसाय हे सगळंच मला माझ्या घरातलंच वाटत आलं. लहानपणापासून मला सगळे म्हणतात, ‘मी माझ्या बाबांसारखी दिसते.’ त्यामुळे दिसण्यावरूनही कधीही मला वेगळं असं कुणी बोललं नाही. या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या मनात कधीही माझ्या जन्मदात्रीचा विचार डोकावत नाही आणि दत्तक असण्याची बोचणी तर कुठेच नाही!

कधी तरी थोडे वेगळे अनुभव येतात परंतु मी त्याचा फार विचार करत नाही. या लोकांची विचार करण्याची लायकी एवढीच आहे, असं म्हणून सोडून देते. बाबांची आत्या, जी बाबांकडे सर्वात वयस्क व्यक्ती आहे, त्यामुळे तिच्याकडे अधूनमधून जाणं व्हायचं. तिला मात्र मी दत्तक आहे हे मुळीच आवडायचं नाही, ती कधीही मला जवळ घ्यायची नाही, मायेने हात फिरवायची नाही, परंतु माझ्या चुलत भावाला मात्र मिठीत घेऊन लाड करायची. घरी जाताना त्याला मात्र खाऊसाठी पैसे द्यायची. मला याचा त्रास व्हायचा, मी आई-बाबांशी बोलायचे, त्या वेळी ते म्हणायचे ‘अगं ती जरा तशीच आहे, तुझा भाऊ तिला वंशाचा दिवा वाटतो म्हणून ती तशी वागते.’ मलाही ते पटायचं, मोठी झाल्यावर मात्र आई-बाबा म्हणायचे, ‘अश्विनी, तिला आपलं नातं कळत नाही म्हणून ती असं वागते, दुर्लक्ष करायचं अशा लोकांकडं आणि त्यांच्या वागण्याकडे म्हणजे आपल्याला त्रास होत नाही. तसंही यामुळे आपलं नातं काही बदलत नाही बेटा.’ परंतु या आजीच्या घरचे सगळेच नेहमी माझ्याशी आपुलकीने वागले, त्यांनी कधीच परका भाव दाखवला नाही.

आमच्या शेजारच्या एक आजी आहेत, त्यापण दत्तक प्रक्रियेविषयी खोचकपणे बोलत असतात. मला बघून शेजारच्या त्यांच्या मैत्रिणीला एकदा म्हणाल्या, ‘ही दत्तक आहे ना, म्हणून बहुतेक अजून लग्न ठरत नाही.’ दत्तक प्रक्रियेविषयी कुठे काही वाचलं की मुद्दाम येऊन मला सांगतात, नव्हे वाचायला आणून देतात. एक अनुभव तर असाही आला, माझ्यासाठी लग्नाचं एक स्थळ आलं होतं, त्यांच्याकडून पसंती आली, बाबांनी त्यांना माझ्या दत्तक असण्याबद्दल सांगितलं तर मुलाची आई म्हणाली, ‘अरेव्वा, हे तर सोने पे सुहागा, आमची सून दत्तक आहे, असं आम्हाला समाजात मिरवायला नक्की आवडेल.’ बाबांनी त्याक्षणी त्यांना नकार कळवला. दत्तक प्रक्रिया ही काही मिरवण्याची गोष्ट आहे का? असे अनुभव आले की वाईट वाटतं.’’

समाजातून आलेले असे छोटे छोटे अनुभव कदाचित या मुलांच्या आयुष्यात वादळं निर्माण करू शकतात. अश्विनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिचं आई-बाबांसोबतचं घट्ट नातं, त्यांचे संस्कार आणि तिचं व्यक्तिमत्त्व यामुळे तिच्या आयुष्यात वादळं आलीच नाहीत. प्रत्येक जण थोडा संवेदनशील राहिला तर मला खात्री आहे दत्तक प्रक्रियेतून आलेलं प्रत्येक मूल अशा अनुभवातून जाणारच नाही.

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org