प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सेवक यांच्या पाठोपाठ आशा सेविकांना चाचणीचे प्रशिक्षण

पालघर : करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सेवक यांना प्रतिजन चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या आरोग्य संस्थांमध्ये करोना प्रतिजन तपासणी करण्यात येत असे. मात्र गाव व खेडय़ांच्या पातळीवर तपासणी पोहोचण्यासाठी आशा सेविकांना प्रतिजन तपासणी पद्धतीचे प्रशिक्षण देण्याचा जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम हाती घेतला आहे.

जिल्ह्यतील ग्रामीण भागातील नागरिकांना करोना लागण झाल्याचे लवकरात लवकर निदान करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यतील आशा सेविकांना प्रतिजन चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. डहाणू तालुक्यातील ४५०-५०० आशा सेविकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून वाडा, वसई तालुक्यांमध्ये प्रशिक्षणाची काही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

ग्रामीण भागात आजारी असणाऱ्या रुग्णांना प्रतिजन करोना चाचणीसाठी पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत असे. रुग्णांना आरोग्य केंद्रापर्यंत आणण्यासाठी अडचणी येत असत. तसेच नागरिक वेगवेगळ्या कारणांमुळे स्वत:ची तपासणी करून घेण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे आजाराचे संक्रमण झाल्यानंतर रुग्ण गंभीर होणे, त्यांचा मृत्यू होणे व त्याचबरोबरीने आजाराचा प्रसार होण्यास असे संसर्ग झालेले नागरिक कारणीभूत ठरत होते.

पालघर जिल्ह्यत २२०० पेक्षा अधिक आशा सेविका अजून डहाणू तालुक्यातील सर्व आशा सेविकांची प्रतिजन तपासणी प्रशिक्षण पूर्ण झाल्याची माहिती डहाणूच्या साहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यामुळे करोना तपासणी व्यवस्था दुर्गम भागापर्यंत पोचण्यास मदत होईल, अशा त्या पुढे म्हणाल्या.

जिल्ह्यतील सर्व आशा सेविकांना प्रतिजन तपासणी करण्याचे प्रशिक्षण देण्याचे हाती घेण्यात आले असून वाडा, वसई तालुक्यात या पद्धतीचे प्रशिक्षण आयोजित केल्याची जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

हे प्रशिक्षण ऐच्छिक असले तरी अधिक तर आशा सेविका या प्रशिक्षणात सहभागी होत असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले असून करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आशा सेविकांची प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपक्रम

  • जिल्ह्यतील आरोग्य विभागातील अधिकारी वर्गातर्फे विविध आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी, गट प्रवर्तक व आशा कर्मचारी यांच्याशी संवाद साधण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
  • करोना रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यास रुग्ण शोध, तपासणी आणि उपचार (ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट) ही संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली. तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये बालकांना आजार होण्याची शक्यता आणि त्या दृष्टीने आशांची भूमिका तसेच ‘क्लीन अप विलेज’ संकल्पनेप्रमाणे आपले गाव स्वच्छ करण्याचे व ठेवण्याचे आश्वासन आशा सेविकांकडून घेण्यात येत आहे.
  • कामण प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांचे प्रशिक्षण वसई येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अंजली गोकर्ण ५ जून रोजी आयोजित करण्यात आले होते. बालकांमध्ये करोना उपचारादरम्यान परिचारिकांची भूमिका, बालकांच्या कोविड उपचारादरम्यान आय व्ही कॅन्यूलेशन, ऑक्सिजन लावणे, इत्यादी कौशल्ये बारकाव्यासह प्रशिक्षण देण्यात आले.
  • तिसऱ्या लाटेमध्ये बालके जास्त प्रमाणात प्रभावित होण्याची शक्यता गृहीत धरून अशा प्रकारचे प्रशिक्षण सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.