News Flash

पालघर जिल्ह्य़ात अकरावी प्रवेशाचा पेच

गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यची अकरावीची प्रवेश क्षमता सुमारे ४० हजार इतकी होती.

उत्तीर्णाचे प्रमाण जास्त, प्रवेश क्षमता कमी; वर्ग वाढविण्याची मागणी

निखील मेस्त्री
पालघर : पालघर जिल्ह्यत दहावीच्या परीक्षेत ६४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांंचा ओढा असलेल्या नामांकित महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी असल्याने अकरावीच्या प्रवेशाचा पेच निर्माण होणार आहे. वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांंचा कल असून जिल्ह्यतील महाविद्यालयांची मर्यादित संख्या असल्याने विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचे आव्हान उभे ठाकले आहे.

गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यची अकरावीची प्रवेश क्षमता सुमारे ४० हजार इतकी होती. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंची संख्या लक्षात घेता यंदा जवळपास २० हजार विद्यार्थ्यांंच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाच्या धोरणानुसार यंदा दहावीनंतर अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावयाची आहे. दहावीनंतर सीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांंना प्राधान्यक्रमाने प्रवेश देण्यात येणार आहे.

ही परीक्षा ऐच्छिक असली तरी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांसाठीही महाविद्यालयांमध्ये प्रवेश देणे अपेक्षित आहे. मात्र याबाबतचे नियोजन अजूनही शिक्षण विभागामार्फत न झाल्याने विद्यार्थ्यांंच्या प्रवेशाबाबत नियोजन केल्यानंतरच अकरावीच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाईल, असे शिक्षण विभागामार्फत सांगण्यात येत आहे. सद्य:स्थितीत अकरावीमध्ये एका वर्गात ऐंशी ते शंभर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

त्यामुळे या विद्यार्थ्यांंना शिक्षण देणे जिकिरीचे होत आहे. यंदा प्रवेश क्षमतेला घेऊन अनेक अडचणी असल्यामुळे शिक्षण विभागामार्फत २० टक्के विद्यार्थी वाढ मान्यता दिली जाणार आहे. वर्गात विद्यार्थी संख्या मोठी झाल्यास याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांंच्या शिक्षणावरच होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वाढ मान्यता न देता वर्ग वाढीची मान्यता द्यावी, अशी मागणी या निमित्ताने महाविद्यालये, शिक्षण संस्था यांच्याकडून समोर येत आहे.

सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांना दहावीनंतर कौशल्याधारित अल्पावधीच्या अभ्यासक्रमाकडे वळविणे अत्यंत गरजेचे आहे. जी कनिष्ठ महाविद्यालये माध्यमिक शाळेला संलग्न आहेत त्या ठिकाणी एका वर्गामध्ये जास्तीत जास्त ८० विद्यार्थी बसू शकतात. तर जी कनिष्ठ महाविद्यालये पदवी महाविद्यालयाला जोडलेली आहेत. त्या कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गामध्ये १२० विद्यार्थी बसू शकतात. दोन्ही प्रकारच्या वर्गांसाठी जरी १५ ते २० टक्के विद्यार्थी संख्या वाढवून दिली तरी त्याचा अध्यापनावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त होत आहे

शासन कोणीही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून अनेक महाविद्यालयांना अतिरिक्त तुकडय़ा वाढवून देईल. मात्र या वाढीव तुकडय़ा विनाअनुदानित असल्याने नफेखोरी करणाऱ्या शिक्षण संस्था विद्यार्थ्यांंकडून विनाअनुदानित वर्गाचे अतिरिक्त शुल्क वसूल करतील, अशी भीती आहे. पायाभूत सुविधा, अर्हताधारक शिक्षक आदी बाबी या संस्था विद्यार्थ्यांंना उपलब्ध करून देतील याची कोणतीही शाश्वती नाही. म्हणूनच तुकडी वाढ देताना याबाबतची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पात्र विद्यार्थ्यांंना अकरावीमध्ये सामावून घेण्यासाठी चांगल्या शिक्षण संस्थांना तुकडय़ा वाढवून देणे हा पर्याय आहे. तुकडय़ा वाढीचा प्रस्ताव मंजूर होताना उशीर झाल्यास मान्यतेला ऑक्टोबर, नोव्हेंबर महिना उजाडेल आणि विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होईल, अशी भीतीही आहे.

अकरावी विद्यार्थी प्रवेश यंदा जिकिरीची व गुंतागुंतीची होणार आहे. शिक्षण संचालक व जिल्हा शिक्षण विभाग यांच्याकडे वर्गवाढीच्या मान्यतेचे अधिकार दिल्यास प्रवेशाचे नियोजन सोपे होईल. वर्ग तुकडी वाढ हाच यावर एकमेव उपाय आहे.

डॉ. किरण सावे, प्रभारी प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर

अकरावी प्रवेशाबाबत अजूनही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. वरिष्ठ स्तरावरून त्याचे नियोजन केले जाणार असल्याने पालघर जिल्ह्यत कोणीही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.

– संगीता भागवत, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 2:51 am

Web Title: eleventh entry problem in palghar district ssh 93
Next Stories
1 वाडय़ात पावसाचे रौद्र रूप
2 मासेमारी विधेयकामुळे पेच
3 देहरजा नदीवरील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी धोकादायक
Just Now!
X