पावसाची उसंत; वाडा उपविभागात पेरणीची ५० टक्के कामे पूर्ण

वाडा: गेल्या आठवडय़ात झालेल्या दमदार पावसाने गेली दोन दिवस उसंत घेतल्याने वाडा उपविभागात येणाऱ्या वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा या चारही तालुक्यात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. या चारही तालुक्यात ५० टक्केहून अधिक पेरणीची कामे पूर्ण झाली असून येत्या आठवडाभरात १०० टक्के पेरणीची कामे पूर्ण होतील असे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद जाधव यांनी सांगितले.

वाडा, जव्हार, विक्रमगड, मोखाडा या तालुक्यात भाताचे सर्वाधिक पीक घेतले जाते. या पिकासाठी सध्या पडत असलेला पाऊस अत्यंत पोषक असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. ‘तोक्ते’ चक्रीवादळात कोसळलेल्या पावसानंतर जमिनीला आलेल्या ओलाव्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कोरडवाहू पेरणी करून घेतली. त्यानंतर गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसात चिखल पेरणीची कामे वेगाने सुरू केली आहेत. येत्या आठवडाभरात या चारही तालुक्यात पेरणीची कामे पूर्ण होतील असे सांगितले जात आहे.

मोखाडा, जव्हार भागात नाचणी, तुर, वरी याचीही पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत पडत असलेला पाऊस पेरणीची कामे करण्या योग्य असून पेरणी केलेल्या बियाणांची उगवण ८० ते ८५ टक्के असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. वाडा उपविभागात येणाऱ्या वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या चार तालुक्यात खरीप पिकांचे क्षेत्र ४५ हजार हेक्टर इतके असून यामध्ये ३८ ते ४० हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. उर्वरित क्षेत्रावर तूर, नाचणी, वरी, व उडदाचे पीक घेतले जाते. पावसाची अशीच साथ यापुढेही कायम राहिली तर यावेळी उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते.

-मिलिंद जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी, वाडा.