डहाणू तालुक्यातील कोसेसरी गावातील विद्यार्थ्यांचे भयाण वास्तव

पालघर : आमचा पाल्य घरी येईपर्यंत धाकधूक असते. नदीच्या काठी एकदा त्याला पाहिले की मुलांमध्ये अडकलेला आमचा जीव सुटकेचा नि:श्वास टाकतो, अशी प्रतिक्रिया शिक्षणासाठी दररोज जीव धोक्यात घालून बोट, तराफ्यातून सूर्या नदी ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डहाणू तालुक्यातील कोसेसरी, भवाडी गावातील विद्यार्थ्यांचे हे भयाण वास्तव आजही कायम आहे. शिक्षणासाठी सुमारे १०० मीटर खोल नदीपात्र ओलांडून कासा, विक्रमगड तालुक्यांत या विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे.

डहाणू तालुक्यात कोसेसरी गावाजवळ सूर्या ही नदी आहे. गावात माध्यमिक शाळा नसल्याने येथील चार-पाच गावांतील सुमारे ४० विद्यार्थ्यांना कासा, विक्रमगड आदी ठिकाणी शिक्षणासाठी जावे लागते. रस्ते प्रवास हा या गावांपासून २० किलोमीटर फेरा टाकणारा खर्चीक व वेळखाऊ असल्याने या विद्यार्थ्यांना नदी पत्रातून जाणे सोयीचे आहे. मागील अनेक वर्षांपासून या नदीवर पूल व्हावा अशी गावांची मागणी आहे. मात्र याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नदीपात्रातून तरंगत प्रवास करावा लागत आहे. ही बाब अत्यंत धोकादायक असली तरी पर्याय नसल्याने हा जीवघेणा प्रवास अनेक वर्षांपासून सुरूच आहे.

विद्यार्थीच नव्हे तर वेळ व पैसा वाया जाऊ  नये यासाठी रुग्ण, वृद्ध यांनाही याच नदीपात्रातून जावे लागत आहे. नदीच्या दोन्ही काठाला एक दोरखंड बांधला असून या दोरखंडाच्या साहाय्याने तराफा किंवा बोट ढकलत ढकलत दुसऱ्या किनाऱ्यावर जावे लागते. अशा वेळी एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल येथील पालक विचारत आहेत. २००० सालापासून या नदीवर मानवी वाहतूक करणारा पूल बांधून मिळावा यासाठी येथील लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी अनेक सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवले मात्र अजूनही हाती काहीच लागले नसल्याने येथील गावांचा सरकारवरील विश्वास उडाला असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

सध्या दहावीच्या मूल्यांकनाचे काम सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना तोंडी व लेखी परीक्षांना शाळेत जावे लागते. यासाठी हे विद्यार्थी शाळेत जात असताना असा धोकादायक प्रवास करीत आहेत.

 

दररोज नदीतून प्रवास करताना भीती वाटत आहे. पालकही विद्यार्थी घरी येईपर्यंत चिंतेत असतात. पर्याय नसल्याने हा नदी प्रवास करावा लागतोय. – सागर भवर, विद्यार्थी, कोसेसरी

 

मुलं घरी येईपर्यंत जीव घुसमळत असतो. मुलांना पाहिले की जिवात जीव येतो. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडावे यासाठी जीवघेणा आटापिटा कधीपर्यंत सुरू राहील हे माहीत नाही. – रत्न राबड, पालक

सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मंत्रालय स्तरांवर अनेक ठराव, अनेक मागण्या, अनेक तगादे लावल्यानंतरही दखल घेतली जात नाही हे दुर्भाग्य की उदासीनता हेच कळत नाही. – शैलेश करमोडा, स्थानिक जि. प. सदस्य