पालघर : हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे  जिल्हा प्रशासन त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यांनी मागणी केल्यानुसार राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) जिल्ह्य़ात दाखल झाले आहे.

पालघर जिल्ह्यत सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. धोधो पाऊस पडत असल्याने नदी, नाले, ओहोळ यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. हवामान खात्याने पालघर जिल्ह्यत पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमी     वर पालघर जिल्ह्यसाठी पाच अधिकारी व ३३ जवानांची एनडीआरएफची दोन पथके पालघरमध्ये मनोर व वसई येथे दाखल झाली आहेत. मनोर येथे तीन अधिकारी व १७ जवान तसेच वसई येथे दोन अधिकारी व १६ जवान तैनात आहेत. जिल्ह्यत कुठेही आपत्ती उद्भवल्यास या टीमकडे अद्ययावत यंत्रणा आहेत. याचबरोबर पूरजन्य परिस्थितीसाठी बोट, लाइफ जॅकेट, झाडे कापण्याची यंत्रे या टीमकडे आहेत. याचबरोबर काही पाणबुडेही या पथकामध्ये असल्याचे पथकाचे डेप्युटी कमांडन्ट अनिल तलकोतरा यांनी लोकसत्ताशी बोलताना म्हटले आहे.