पावसामुळे प्रादुर्भाव कमी झाल्याने नारळाच्या झाडाच्या वाढीसाठी पोषक वातावरण

पालघर: जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात नारळाच्या झाडांवर पसरलेला स्पायरेलिंग व्हाइट फ्लाय (Rugose Spirallying white fly) अर्थात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव यंदाच्या पावसाळ्याच्या आरंभी झालेल्या दमदार पावसामुळे नियंत्रणात आला आहे. यामुळे नारळाच्या व त्याखाली उगवणाऱ्या इतर झाडांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

सन २०१९ च्या ऑक्टोबर महिन्यापासून पांढऱ्या माशीचा पालघर जिल्ह्यातील नारळाच्या झाडावर प्रादुर्भाव जाणवू लागला. ही माशी झाडाच्या पानांमधील पोषक द्रव्य शोषण करीत असल्याने दीर्घकालीन नारळाच्या वाढीवर परिणाम होतो. शिवाय या माशीकडून सोडण्यात येणाऱ्या चिकट द्रव्यामुळे झाडाची पाने काळी होऊन त्यांच्यामधील प्रकाशसंश्लेषण करण्याची क्रिया खंडित होत असल्याचे दिसून आले आहे.

या माशीच्या प्रसाराच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठाने तसेच कृषी विभागाने सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे कठीण होत असल्याने या पांढऱ्या माशीचा प्रसार मोठय़ा प्रमाणात वाढला. सन २०२० मध्ये ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर जोरदार पाऊस झाल्याने पांढरी माशी पावसाच्या पाण्याबरोबर काही प्रमाणात वाहून गेली होती.

मात्र पावसाने उघडीप घेतल्यानंतर पुन्हा हा माशीचा प्रादुर्भाव वाढला होता. नारळाच्या झाडांसोबत नारळाच्या बागेच्या लगत उगवणाऱ्या केळी, पपई, जास्वंद इत्यादी पिकांवर प्रादुर्भाव होऊन नारळाच्या परिसरात उगवणाऱ्या इतर झाडांची पाने काळसर होत असल्याचे तसेच उत्पादनावर परिणाम होत असल्याचे दिसून आले होते.

यंदाच्या हंगामात मे महिन्याच्या मध्यावर आलेल्या चक्रीवादळादरम्यान मुसळधार पाऊस झाला. तसेच जून महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात दोन-तीन वेळा जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने नारळाच्या झावळ्यांवर असलेल्या पांढऱ्या माशीने अंथरलेला चिकट द्रव्याचा थर निघून गेला आहे. त्यामुळे उन्हाने करपल्याप्रमाणे पानांची अवस्था झाली असली तरी झाडांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे कृषीतज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

गेल्या दोन पावसाळ्यांच्या हंगामात नारळाच्या झाडावरील माशी अंथरलेल्या चिकट द्रव्यरूपी कळसळ पदार्थ वाहून जाण्यास जुलैअखेर-ऑगस्ट महिना उजाडत होता, मात्र यंदा हीच प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी झाल्याने नारळाच्या वाढीसाठी काहीसे पोषक वातावरण तयार झाले आहे.