News Flash

लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी भगतांमार्फत प्रबोधन

जिल्ह्यच्या ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला मिळत असलेल्या मर्यादित प्रतिसादामुळे जिल्हा प्रशासनाने लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत.

लसीकरण केलेल्या भगतांची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित

पालघर : जिल्ह्यच्या ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला मिळत असलेल्या मर्यादित प्रतिसादामुळे जिल्हा प्रशासनाने लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामीण भागातील आजारी व्यक्तींवर औषध उपचार करणाऱ्या भगतांची बैठक घेऊन त्यांचे लसीकरण डहाणूत तालुक्यातील सायवन भागात करण्यात आले. त्याची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित करुन त्यांच्यामार्फत प्रबोधन करण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत.

लसीकरणाबाबत जिल्ह्यतील ग्रामीण भागात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे जिल्हा प्रशासनाने बोलीभाषेत चित्रफित संदेश तयार करणे, शिक्षक व विद्यार्थ्यांंमार्फत ग्रामस्थांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगणे तसेच लोकप्रतिनिधींना लसीकरण उपक्रमात सहभागी करून घेऊन लसीकरणाबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील नागरिक हे आजारपणाच्या काळात भगतांचे मार्गदर्शन घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे करोनाचे लवकर निदान होण्यासाठी तसेच लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी भगत यांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे जाणवल्यानंतर डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी महिन्याभरापासून प्रयत्न सुरू केले आहेत. साधू हत्याकांड घडलेल्या गडचिंचले गावात त्यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच त्या भागातील भगत यांची बैठक घेऊन या प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले. त्याच पद्धतीने त्यांनी असे उपक्रम सुरू ठेवून सायवन भागातील सरपंच व भगत यांची बैठक घेऊन काही भगत तसेच गावातील सरपंच व स्थानिक नेत्यांची लसीकरण करून घेतले. लसीकरण केलेल्या भगतांची चित्रफीत करून ही समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली आहे. अशा उपक्रमांमुळे लसीकरणाबाबत समाजातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल, असे  प्रशासनाला वाटते.प्रशासनाने जिल्ह्यतील हजार- बाराशे भगत यांची यादी तयार केली असूनकरोना आजारात लवकर निदान होणे गरजेचे असल्याबाबत तसेच लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरे आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.

कुपोषण विरोधी लढय़ातही भगतांची मदत

जिल्ह्यतील कुपोषित बालके व बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याच्या लढय़ात तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर व जिल्हा प्रशासनाने भगतांना विश्वासात घेऊन कुपोषण मागील कारणांची माहिती देऊन जागृती केली होती. कुपोषित बालकांना उपचारासाठी वैद्यकीय केंद्रांमध्ये दाखल करण्यासाठी भगत मंडळींना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाला समाधानकारक प्रतिसाद लाभला होता असे जिल्हा प्रशासनाने सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:41 am

Web Title: prabodhan bhagat increase percentage vaccination corona virus ssh 93
Next Stories
1 ‘आरटीओ’ उमरोळीत
2 ‘त्या’ सात लोकप्रतिनिधींचे कर्तृत्व अजूनही आठवणीत
3 निर्बंध शिथिलतेच्या उत्साहावर ‘पाणी’
Just Now!
X