मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर श्रमजीवी संघटनेचे ‘रास्ता रोको’आंदोलन

कासा/वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि सतत होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याचा संताप मंगळवारी व्यक्त करण्यात आला. या महामार्गाचे व्यवस्थापनात हलगर्जीपणा करणाऱ्या ‘आयआरबी’च्या विरोधात श्रमजीवी संघटनेकडून राष्ट्रीय महामार्गावर एकाचवेळी तब्बल १४ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग हा अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर निर्माण होत असलेल्या समस्येकडे महामार्ग प्राधिकरण व आयआरबी यांच्यामार्फत दुर्लक्ष केले जाऊ लागले आहे. याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. वाहतूक कोंडी व रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे विशेष करून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिकच तोंड द्यावे लागत आहे.

महामार्गावर घोडबंदर, वसई, चारोटी टोल नाका, दापचरी सीमा तपासणी नाका चिंचोटी उड्डाणपूल या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. महामार्गावर पडलेले खड्डे यामुळे अनेक वेळा अपघात होऊन निष्पाप चालकांचे व नागरिकांचे जीवदेखील जात आहे, खड्डय़ामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, तर टोल नाका येथे ही फास्टॅगसारख्या व्यवस्था बंद पडल्यानेही वाहनाच्या रांगा लागत असतात. वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणे जिकिरीचे होऊन बसते. या सगळ्याला ‘आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर’ जबाबदार असून कंपनीचा हलगर्जी कारभाराला वाचा फोडण्यासाठी श्रमजीवी संघटनेकडून हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आल्याची माहिती पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड यांनी दिली आहे.

आजारी रुग्णांनाही येथून उपचारासाठी नेण्यात अडचणी येत असल्याचे आंदोलनकर्ते हेमंत बात्रा यांनी सांगितले आहे. वसई विरारच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या घोडबंदर पुलाजवळ ही मोठी वाहतूक कोंडी होते यावरही तोडगा निघत नसल्याचे श्रमजीवीचे गणेश उंबरसाडा यांनी सांगितले.

संघटनेतर्फे एकाचवेळी राष्ट्रीय महामार्गावर संपूर्ण पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात ससुनवघर, चिंचोटी, शिरसाड, पेल्हार, सकवार खानिवडे टोल नाका, पालघरमध्ये वराई फाटा, मस्तान नका, चिल्लार फाटा, सोमटा, डहाणूत दापचरी, तर तलासरी तालुक्यात सूत्रकार फाटा या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. यात मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. रास्ता रोकोमुळे वाहण्याचा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सकाळी शांतता, दुपारी आक्रमक

सकाळ सत्रात आंदोलन हे शांततेत सुरू होते. मात्र दुपारनंतर आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट महामार्ग रोखून धरला होता. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त होता. येत्या आठ दिवसांत आम्ही यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, याबाबतचे निवेदन देण्यात येऊन आय आर बी अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडी व खड्डे बुजविण्याबाबत सूचना देण्यात आली.  सदर रास्ता रोको आंदोलनाठिकाणी आय आर बी कंपनी प्रशासनाचे कर्मचारी, अधिकारी व पोलीस प्रशासन उपस्थित होते.