बंदी आदेशामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी; निर्णयावर जिल्हा प्रशासन ठाम

पालघर: जिल्ह्यतील नदी, नाले धबधबे, तलाव, धरणे, किल्ले व समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना बंदी असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढल्यानंतर जिल्ह्यतील पर्यटन व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अनेक घडलेल्या घटना लक्षात घेता असा मनाई आदेश हा सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

पावसाळ्या दरम्यान पालघर जिल्ह्यतील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी रेलचेल असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून करोना सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पर्यटकांनी किनाऱ्याकडे पाठ फिरवली होती. यामुळे पालघर जिल्ह्यतील समुद्र किनारपट्टी भागात चालणारा पर्यटन व्यवसाय पूर्णपणे डबघाईला आला होता. गेल्या दोन वर्षांत व्यवसाय व्यवस्थित न झाल्यामुळे हे व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यातच जिल्हा प्रशासनाने विविध ठिकाणी पर्यटन बंदी केल्यामुळे आधीपासूनच डबघाईला आलेला पर्यटन व्यवसाय आणखी खोलात जाणार आहे, असे पर्यटन व्यावसायिक सांगत आहेत.

गेल्या चार वर्षांपासून जिल्हा प्रशासन दरवर्षी मनाई आदेश काढत असल्यामुळे पर्यटक मान्सून दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर पाठ फिरवत आहेत. याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसत असून जिल्ह्यच्या आर्थिक विकासालाही खीळ बसत आहे. हा आदेश पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काढला गेला असला तरी प्रत्यक्षात ज्या पर्यटनाच्या ठिकाणी दुर्घटना किंवा अपघात घडत आहेत, अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी लक्ष देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूचना देणे अपेक्षित आहे. तसेच अशा ठिकाणी पर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनीही त्यांच्याकडे येणाऱ्या पर्यटकांना त्या अनुषंगाने खबरदारीच्या सूचना देणे आवश्यक आहे, असे विविध पर्यटन व्यवसायिक यांचे म्हणणे आहे. या आदेशामुळे पर्यटन व्यवसायाला आणखीन उतरती कळा लागणार आहे.

अनेकांनी पर्यटन व्यवसायासाठी कर्ज घेतलेली आहेत. व्यवसायच चालला नाही तर ही कर्ज फेडायची कशी असा प्रश्नही व्यावसायिकांना उपस्थित होत आहे. याचबरोबरीने पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या मोठय़ा रोजगाराच्या साखळीवर याचा थेट परिणाम होणार असून त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न या मनाई आदेशामुळे उपस्थित होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यटन बंदीचे आदेश ज्या ठिकाणी अपघात दुर्घटना घडत आहेत अशा ठिकाणांसाठी लागू कराव्या अशी मागणी व्यावसायिक यांच्यातर्फे समोर येत आहे.

अपघात, दुर्घटनांचे कारण

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यतील विविध पर्यटन स्थळांवर अनेक अपघात, दुर्घटना तसेच जीवितहानी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे हे आदेश पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी काढला गेला असून पर्यटन व्यवसायिकांनी ही पर्यटकांना खबरदारीच्या सूचना द्यायला हव्यात असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

आदेशाबाबत संभ्रम

जिल्ह्यतील विविध पर्यटन स्थळे पर्यटकांना मनाई आदेश असल्याचे जिल्हा प्रशासनाने गुरुवारी जाहीर केले असले तरी या आदेशांमध्ये पर्यटन बंदीसह करोना प्रादुर्भावाचे कारण दिले गेले आहे. त्यामुळे हा आदेश नक्की कोणत्या कारणासाठी आहे याबाबत व्यावसायिकांमध्ये संभ्रम कायम आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा आदेश दरवर्षी या काळात जाहीर होतो. सुरक्षा हाच याचा मुख्य उद्देश आहे.

– किरण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी

जिल्हा प्रशासनाने पर्यटक बंदीचा काढलेला आदेश जाचक आहे. दोन वर्षांपासून विविध कारणांनी आर्थिक विवंचनेत असलेले पर्यटक व्यवसायिक आणखीन डबघाईला लागणार आहेत.

भूषण सावे, पर्यटन व्यावसायिक, केळवे