scorecardresearch

एडवण येथे प्रदूषणाच्या लाटा ; जाळय़ांत माशांऐवजी प्लास्टिकचा कचरा

एडवण समुद्रकिनाऱ्यावर आणि तेथील तिवराच्या झाडांच्या मुळावर मेणसदृश रासायनिक थर साचला आहे.

एडवण येथे प्रदूषणाच्या लाटा ; जाळय़ांत माशांऐवजी प्लास्टिकचा कचरा

नितीन बोंबाडे

डहाणू : एडवण समुद्रकिनाऱ्यावर आणि तेथील तिवराच्या झाडांच्या मुळावर मेणसदृश रासायनिक थर साचला आहे. त्याचबरोबर प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्रदूषणकारी कचऱ्याचा खच आहेच. यामुळे जलप्रदूषण होत असून पारंपरिक मासेमारी धोक्यात आली आहे.एडवण, कोरे, दातिवरे येथे समुद्रकिनाऱ्याजवळ दगडाचे बांध बांधून मच्छीमार मासेमारी करतात. मात्र सध्या त्यांच्या जाळय़ात माशांऐवजी प्लास्टिक पिशव्या, बाटल्या असा कचरा पाहायला मिळतो. उत्तनपासून झाईपर्यंत हा प्लास्टिकचा कचरा जाळय़ात दिसतो. हा कचरा पेटवल्यास काळा धूर पसरतो आणि दरुगधी येते. याचबरोबर किनाऱ्यावर मेणसदृश थर दिसत आहे. एडवण समुद्रकिनारा, आशागड मंदिर आणि महादेव मंदिर या ठिकाणी पर्यटक येत असतात. मात्र समुद्रकिनाऱ्यावरील दरुगधीमुळे त्यांचीही गैरसोय होत आहे.

प्लास्टिक कचऱ्यामुळे समुद्र किनारपट्टीवरील पर्यावरण धोक्यात आले आहे. समुद्रातील तेल तवंगामुळे सागरी जीवांवर दुष्परिणाम होतो आहे. छोटे झिंगे, खेकडे, शिंपल्या आदी प्रजातींना धोका निर्माण होतो. प्रवाळांचे नुकसान होते, जे भरून निघत नाही. त्याचबरोबर दूषित मासे अन्नात गेल्यास त्यातूनही जीवघेणे आजार होऊ शकतात. समुद्राच्या प्रदूषणामुळे जलचरांच्या अन्नसाखळीत अडथळा निर्माण होतो. परिणामी सागरी पर्यावरण बिघडते.
मुंबईमधील सायन कोळीवाडय़ातील स्थानिकांनी पूर्वी समु्द्रात प्रदूषणकारी कचरा प्रचंड साठल्याची तक्रार केली होती. त्या वेळी त्यांना त्याची नुकसानभरपाई मिळाली होती. त्याचप्रकारे एडवण आणि आसपासच्या परिसरातील मच्छीमारांनाही नुकसानभरपाई मिळायला हवी, अशी मागणी होत आहे.

एडवण समुद्रकिनाऱ्यावरील मेणसदृश थरामुळे तसेच प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे पारंपरिक मासेमारीला धोका उत्पन्न झाला आहे. या प्रदूषणामुळे सागरी जीवांना धोका निर्माण झाला आहे. संबंधित यंत्रणांनी याविषयी योग्य ती कार्यवाही करावी. – देवेंद्र तरे, स्थानिक

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या