पालघर : पावसाळा लांबणीवर पडला असला तरी पालघर जिल्ह्यात जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्यातरी पाणी कपातीचे संकट टळले आहे. विविध धरणांमध्ये ४० टक्केपेक्षा अधिक पाणी अजूनही शिल्लक आहे. जिल्ह्यात धामणी, कवडास व वांद्री ही प्रमुख धरणे वसई, विरारसह इतर शहरे तसेच पालघर डहाणू तालुक्याची तहान भागवत आहेत. तसेच तारापूर औद्योगिक वसाहत व लगतच्या परिसरातही या धरणांचे पाणी पुरवले जाते. तिन्ही धरणे एकत्रित करून सूर्या पाणी प्रकल्प तयार झाला आहे. बहुतांश गावे व शहरे ही पाण्यासाठी या प्रकल्पावर अवलंबून आहेत.
याचसोबत काही लहान व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांमधून तेथील लगतच्या गावांना योजनेनुसार पाणी पुरवले जाते. पालघर तालुक्यात माहीम केळवा झांजरोली या धरणाला अलीकडे अचानक गळती लागल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी करण्यात आला होता. या बंधाऱ्यात आत्ता फक्त ०.२२६ दलघमी म्हणजे ७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
‘कवडास’मध्ये ९७.९९ टक्के पाणी
जिल्ह्यातील बहुतांश भाग हा पाण्यासाठी सूर्या प्रकल्पावर अवलंबून असून धामणी धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठयाची क्षमता २८६.३१ दलघमी आहे. त्यात सुमारे २४ टक्के म्हणजे ७५.५४९ दलघमी पाणीसाठा अजूनही आहे. कवडास धरणाची क्षमता १३.७१ आहे. या धरणात ९७.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शेतीच्या सिंचनासाठी पाणी देणाऱ्या वांद्री धरणामध्ये ५६.९४ टक्के आणि कुर्झे धरणात ६० टक्केहून अधिकचा पाणीसाठा शिल्लक आहे.
पालघर जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी चणचण भासणार नाही.
– रवी पवार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, मनोर