|| रमेश पाटील

नद्यांचे पात्र आटू लागले तरी प्रशासनाचे दुर्लक्ष

वाडा : वाडा, विक्रमगड तालुक्यातील नद्या, नाल्यांवर पाणी अडविण्यासाठी लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद पाटबंधारे यांच्याकडून कोट्यवधी रुपये खर्च करून बंधारे बांधले आहेत.  पाऊस जाऊन महिना झाला तरी  बंधाऱ्यांचे दरवाजे अजूनपर्यंत उघडेच आहेत. त्यामुळे पाणी वाया जात आहे. पाणी संपल्यानंतर हे दरवाजे बंद केले जातील काय असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

वाडा तालुक्यातून वैतरणा, तानसा, पिंजाळी, गारगाई व देहेर्जा या पाच नद्या विविध भागांतून पावसाळ्यात वाहत असतात. या पाचही नद्यांमधील पाणी ऑक्टोबर महिन्यात आडवून ते  साठविण्यासाठी पाटबंधारे विभागाने विविध ठिकाणी वाडा तालुक्यात ३० हून अधिक कोकण पद्धतीचे (केटी) बंधारे बांधले आहेत. त्यात तानसा नदीवर जाळे, उचाट, मेट या ठिकाणी तर वैतरणा नदीवर बालिवली, तिळसा, गातेस, घोडमाळ, सांगे, हमरापूर येथे व पिंजाळी नदीवर सापणे, पाली, आलमान  येथे तर गारगाई नदीवर ओगदा वडपाडा, गारगांव, शिलोत्तर, पीक तसेच विक्रमगड तालुक्यात देहेर्जा नदीवर सावरोली, ब्राम्हणगांव येथील बंधाऱ्यांचा समावेश आहे.

या बंधाऱ्यांचे दरवाजे पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस काढून ठेवले जातात व ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत  पाणी अडविण्यासाठी पुन्हा लावले जातात. मात्र नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी अजुनपर्यंत निम्म्या बंधाऱ्यांचे दरवाजे बंद केलेले नाहीत. यामुळे येथील   नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत. दरवाजे बंद करायला एक महिना उशीर झालेला असताना पाटबंधारे विभागाला अजून जाग का येत नाही, असा सवाल येथील शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

येथील सिंचन क्षेत्रात गेल्या २४ वर्षांत दोन टक्क्यांनीही वाढ झालेली नाही. परिणामी येथील कोरडवाहू जमीन तशीच पडून राहिली आहे. बंधाऱ्यातील पाणीसाठ्यावर शेतकरी भाजीपाला, कलिंगड, फुलशेती आदी पिकांची लागवड करतात. त्यांना फेब्रुवारी, मार्च महिन्यात पाण्याअभावी पिके घेता येत नाही. या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठा झाल्यानंतर या परिसरातील विहिरी, कूपनलिका यांच्यामध्ये पाण्याची पातळी वाढलेली दिसून येते. मात्र पाणी अडविण्याकडे नेहमीच संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या या गलथान कारभाराचा येथील शेकडो शेतकऱ्यांना  दरवर्षी मोठा फटका बसत असतानाही प्रशासन व येथील लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहेत.

दररोज लाखो लिटर पाणी वाया

 गेल्या पंधरा वर्षांत वाडा तालुक्यातील  पाचही नदींवर बांधलेल्या प्रत्येक बंधाऱ्यात गळतीचे प्रमाण  अधिक  आहे. ही गळती रोखण्यासाठी उपाययोजना केली जात नाही. तसेच फायबरचे दरवाजे अनेक ठिकाणी तुटलेले आहेत, लोखंडी दरवाजे खूप जुने झाल्याने गंज लागला आहे. असे दरवाजे लावल्याने गळतीचे प्रमाण अधिक रहात असते. तालुक्यातील पाली येथे महाराष्ट्र शासन लघु पाटबंधारे विभाग वाडा यांनी बांधलेल्या बंधाऱ्याचेही दरवाजे बसविले न गेल्याने या बंधाऱ्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाया चालले आहे.

वाडा  तालुक्यातील सर्वच बंधाऱ्यांमध्ये आधीच गळतीचे प्रमाण अधिक आहे. त्यातच बंधाऱ्याचे दरवाजे प्रशासन बंद करायला दरवर्षी उशीर करीत आहे. – राजन नाईक, शेतकरी, रा. सापणे, ता. वाडा

 नदी पात्रातून भरपूर पाणी वाहत आहे. वाहत असलेल्या पाण्याचा अंदाज घेऊनच दरवाजे बंद केले जातात. येत्या दोन दिवसांत पाली बंधाऱ्याचे दरवाजे बसविले जातील. – एम.आर. पाटील, समन्वयक, लघु पाटबंधारे विभाग, वाडा