गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाचे पाऊल

पालघर : पालघर जिल्ह्यतील अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय कामांसह जनहिताच्या कामामध्ये गैरप्रकार झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. हे गैरप्रकार शोधून काढण्यासाठी तसेच ते वेळीच थांबवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पाऊल उचलले असून टप्प्याटप्प्याने सर्व ग्रामपंचायतींच्या कामांचे लेखापरीक्षण व चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे.

पेसा ग्रामपंचायतींना मिळणारा पेसा निधी, वित्त आयोगाचा निधी, जिल्हा परिषदेमार्फत वितरित होणारा निधी तसेच इतर मार्गाने विकास कामांसाठी दिला जाणारा निधी, शासकीय योजनांची अंमलबजावणी याचा लेखाजोखा ग्रामपंचायत दप्तरी व्यवस्थितरीत्या ठेवला जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर चौकशी व तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे. या तपासणीमध्ये सदोष आढळलेल्याकडून खुलासे मागविले जातील. हे खुलासे समाधानकारक नसल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.  या परीक्षणामुळे ग्रामपंचायती अंतर्गत झालेले गैरप्रकार यांना वेळीच आळा बसेल, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.  चौकशीमुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. स्वत:ला वाचवण्यासाठी हा वर्ग राजकीय नेते मंडळीकडे खेटे घालत असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

ग्रामपंचायतीतील गैरप्रकार

  • जव्हार तालुक्यात पिंपळशेत या ग्रामपंचायतीअंतर्गत साहित्य खरेदी, न्याहाळे खुर्द येथे सॅनिटायझर घोटाळा.
  • डहाणू तालुक्यातील नरपड, आशागड, चिंचणी या ग्रामपंचायतींमध्ये  शासकीय कामांमध्ये अपहार तसेच शासकीय योजना राबवले नसल्याच्या तक्रारी.
  • विक्रमगड तालुक्यातील उटावली ग्रामपंचायतीमध्ये वैयक्तिक शौचालय निधीचा अपहार. ही शौचालये एका संस्थेने बांधून दिल्यानंतर ती शासकीय योजनांमधून बांधल्याचे दाखवले होते. ओंदे ग्रामपंचायतीतही मोठा भ्रष्टाचार झाला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये ग्रामसेवक निलंबित.
  • तलासरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या कामांबाबत तक्रारी आहेत. मात्र त्यांची चौकशी अजूनही  नाही.
  • पालघर, मोखाडा तालुक्यातही ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांमध्ये अपहार.

ग्रामपंचायतींमध्ये शासकीय निधीचा विनियोग कोणत्या पद्धतीने केला आहे, तसेच प्रशासकीय कामांचा लेखाजोखा कसा ठेवला जात आहे. याची तपासणी नियुक्त केलेले तपास अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.   त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जात आहे.

सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पालघर