बँकेच्या उदासीनतेमुळे हजारो लाभार्थी सरकारी अनुदानापासून वंचित
विजय राऊत
कासा : समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगता यावे यासाठी शासन विविध योजनांमधून अंध,अपंग, विधवा, ६५ वयावरील निराधार वृद्ध अशा नागरिकांना उदरनिर्वाह चालवण्यासाठी मदत व्हावी म्हणून दरमहा अनुदान देते. परंतु बँकांच्या उदासीनतेमुळे बँका अनुदानाचे धनादेश जमा करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याने, गरजू निराधार लाभार्थी या अनुदानापासून वंचित आहेत.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, विधवा, अपंग व परित्यक्ता आदी योजनांमार्फत सरकारी पातळीवर गोरगरीब व गरजूंना एक हजाराचे दरमहा अनुदान दिले जाते. डहाणू तालुक्यात या सर्व योजनांचे जवळपास १९५०० पेक्षा जास्त लाभार्थी आहेत. दरमहा मिळणाऱ्या एक हजार रुपये अनुदानाचा या लाभार्थ्यांंना मोठा आधार असतो. परंतु गेल्या ४ ते ५ महिन्यापासून बँका या अनुदानाचे चेक जमा करून घेण्यास नकार देत आहेत. याचा फटका या लाभार्थ्यांंना बसत आहे. ही मदत लाभार्थ्यांंच्या खात्यात जमा होत असल्याने, हे लाभार्थी अनुदान जमा झाले असेल या आशेने दररोज बँकेचे उंबरे झिजवत आहेत. परंतु त्यांना पुन्हा खाली हाताने घरी जावे लागत आहे.
केवळ बँकांच्या अशा उदासीनतेमुळे या निराधार लाभार्थ्यांवर करोना काळात उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने ही मदत लवकरात लवकर जमा करावी, अशी मागणी या योजनेचे लाभार्थी करत आहेत.
डहाणू तालुक्यातील विविध योजनेतील लाभार्थी
’ संजय गांधी निराधार योजना- ६२८७
’ श्रावणबाळ योजना – ८५५६
’ इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना – ४७७८
’ इंदिरा गांधी विधवा
योजना – ५८
इंदिरा गांधी दिव्यांग योजना झ्र् २
डहाणू तहसील कार्यालयातून लाभार्थ्यांंच्या अनुदानाचे धनादेश वेळेवर बँकेत जमा केले जातात. परंतु बँका धनादेश जमा करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याने लाभार्थ्यांंना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. त्यासाठी आम्ही मुख्य बँक व्यवस्थापकांना पत्रव्यवहार केला आहे.
राहुल सारंग, डहाणू तहसीलदार