लोखंडी अवजारांच्या वाढत्या मागणीमुळे बलुतेदार अडचणीत

पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरल्याने लोखंडी अवजारांना पसंती दिली आहे.

प्रति तासासाठी पॉवर टिलर ६००/- रुपय तर मोठे ट्रॅक्टरसाठी १०००/- रुपयांचा दर

वाडा :  पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरल्याने लोखंडी अवजारांना पसंती दिली आहे. यामुळे शेती व्यवसायातील लाकडी अवजारे कालबाह्य़ ठरली आहेत. याचा परिणाम लाकडी अवजारे बनविणारे बलुतेदारांवर झाला असून त्यांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत.

पालघर जिल्ह्य़ात खरीप हंगामात भातशेती मोठय़ा प्रमाणावर केली जाते. तर रब्बी हंगामात कडधान्य, भाजीपाला, फुलशेती केली जाते. त्याचप्रमाणे फळबाग शेतीही मोठय़ा प्रमाणावर केली जाते. या सर्व प्रकारच्या शेतीची मशागत करण्यासाठी तसेच उखळणी, चिखळणीची कामे करण्यासाठी विविध प्रकारच्या अवजारांची आवश्यकता भासते. या पूर्वी केल्या जाणाऱ्या पारंपरिक शेती व्यवसायात लाकडी नांगर, लाकडी बैलगाडी, अन्नधान्य साठविण्यासाठी बांबूचे कणगे, सूप, टोपली आदी लाकडी साहित्यांचा वापर केला जात होता. मात्र जंगलांचे प्रमाण कमी झाल्याने, शेतीसाठी लागणारे पशुधनही कमी झाल्याने व शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरल्याने लाकडी अवजारे कालबाह्य़ ठरली आहेत.

शेती व्यवसायात नांगरणी, चिखळणी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले लाकडी नांगर गेल्या दहा वर्षांपासून कालबाह्य़ झाले आहेत. जव्हार, मोखाडा या तालुक्यांतील डोंगर तसेच चढ-उतार असलेल्या जमिनीवर नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टर, पॉवर टिलर चालविणे शक्य होत नसल्याने या जमिनीची मशागत करण्यासाठी आजही लाकडी नांगराचा वापर केला जातो.

वनसंपत्तीचा झालेला ऱ्हास, बैल, रेडा यांच्या वाढलेल्या किमती, मजुरांचा अभाव तसेच लाकडी नांगराने मशागत करण्यासाठी लागणारा अधिक वेळ यामुळे लाकडी नांगराची जागा लोखंडी नांगर असलेल्या ट्रॅक्टर, पॉवर टिलर यांनी घेतली आहे. शेतीमध्ये आधुनिकीकरणाचे महत्त्व वाढीस लागले आहे. शेतीमधून अधिक उत्पन्न घेण्यासाठी येथील शेतकरी बाजारात उपलब्ध होणारी नवनवीन अवजारे खरेदी करताना दिसत आहेत.

डिझेलचे दर वाढल्याने आज प्रति तास पॉवर टिलर ६००/- रुपये व मोठे ट्रॅक्टर १०००/- रुपये असा दर शेतीच्या मशागतीसाठी घेतला जात आहे. तरीही शेतकऱ्यांनी या लोखंडी अवजारांनाच अधिक पसंती दिली आहे. बैल जोडी व बैल गाडी महागल्याने बहुतांशी शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉली व टेम्पो गाडीचा उपयोग शेतीचा माल वाहतूक करण्यासाठी करीत आहेत.

बांबूपासुन बनणाऱ्या टोपली, सुपा, कणगे यांची जागा प्लास्टिकने घेतल्याने शेतीसाठी लागणारी ही साधनेही कालबाह्य़ झाली आहेत. शेतीसाठी लागणारी अवजारे बनविणारे सुतार, नांगरासाठी लागणारा फाळ, वसु बनविणारे लोहार तसेच बांबूपासून शेतीमाल साठविण्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू बनविणारे कारागीर तसेच बारा बलुतेदार शेतीची लाकडी अवजारे कालबाह्य़ झाल्याने अडचणीत सापडले आहेत.

सर्वच क्षेत्रांत अधुनिकीकरणाचा वापर होताना दिसून येत आहे. येथील शेतकऱ्यांनीही वेळ वाचविण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन यांत्रिकीकरणाचा वापर करणे काळाची गरज होती.

माधव सांबरे, शेतकरी, रा. शीळ, ता. विक्रमगड.

डोंगरमाथ्यावरील शेती नांगरणी करण्यासाठी आमच्याकडे लाकडी नांगराशिवाय पर्याय नाही. यासाठी कालबाह्य़ ठरू पाहणारी शेतीची काही अवजारांची आजही आम्ही जपवणूक केली आहे व त्यांचा वापर करीत आहोत.

संतोष बुधर, आदिवासी शेतकरी, रा. आखाडा, ता.वाडा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Balutedar difficulty increasing demand iron tools ssh