डहाणू : डहाणू तालुक्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मोठा धक्का देत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश घेतलेले माजी जिल्हापरिषद सभापती काशिनाथ चौधरी यांच्या भाजपा पक्षप्रवेशाला अवघ्या २४ तासांत प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून स्थगिती देण्यात आली आहे. भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना प्रदेश पातळीवरून भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी तातडीने पत्र पाठवून हा निर्णय कळवला आहे. यामुळे स्थानिक भाजपच्या नेतृत्वावर तसेच कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ चौधरी यांनी १६ नोव्हेंबर रोजी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. यासाठी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार हेमंत सवरा, प्रकाश निकम यांनी विशेष प्रयत्न केले होते. ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौधरी यांच्या भाजप प्रवेशामुळे डहाणूतील राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा होती.
या प्रवेश सोहळ्यात खासदार हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, माजी उपाध्यक्ष पंकज कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला होता.
साधू हत्याहत्याकांड प्रकरणात काशिनाथ चौधरी हे प्रत्यक्ष स्थळी असल्याने त्यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भाजपा नेत्यांनी त्यांचा उल्लेख अनेकदा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर पालघर साधू हत्याकांडाच्या संदर्भात चौधरी यांच्या कथित सहभागाबद्दल प्रसिद्धी माध्यम आणि सामाजिक माध्यमांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली. तसेच या विषयी काँग्रेसचे युवा पालघर जिल्हाध्यक्ष सत्यम ठाकूर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे भाजप नेतृत्वाला या विषयाची तातडीने दखल घ्यावी लागली.
आज (१७ नोव्हेंबर) रोजी भाजपा चे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पाठवलेल्या पत्रात चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे सध्या काशिनाथ चौधरी आणि भाजपच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
प्रवेश रद्द करण्यामागची भूमिका
“आपल्याला कळविण्यात येते की, पालघर जिल्ह्यातून पक्षात प्रवेश दिलेल्या काशिनाथ चौधरी यांच्या बाबत पालघर साधू हत्याकांडाशी संबंधीत चर्चा पुन्हा प्रसिद्धी माध्यम व सामाजिक माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर प्राथमिक विचार करून तथ्यांवर आधारित त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, काशिनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशास तत्काळ स्थगिती देण्यात येत आहे.” (रविंद्र चव्हाण यांनी भाजप जिल्हाध्यक्षांना पाठवलेले पत्रामध्ये मजकूर).
भाजप प्रवेशाच्या एका दिवसातच चौधरी यांच्या प्रवेशाला पक्षाने स्थगिती देण्याची भूमिका घेतली आहे. या स्थगितीमुळे डहाणूच्या राजकारणात नवे वादंग निर्माण झाले असून, भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने या गंभीर विषयावर तातडीने घेतलेल्या भूमिकेमुळे चौधरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेविषयी चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात स्थानिक नेत्यांच्या भूमिकेबद्दल चौकशी करण्यात येईल असे भाजप प्रवक्त्यांकडून पत्रकार आणि समाजमाध्यम प्रतिनिधींना सांगण्यात आले आहे.
काय आहे साधू हत्याकांड प्रकरण
१६ एप्रिल २०२० रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात मुलं पळवणारी टोळी समजून गुजरात कडे जाणाऱ्या दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाची हत्या करण्यात आली. या घडलेल्या क्रूर आणि दुर्देवी प्रकरणाला साधू हत्याकांड असे संबोधले जाते.
सुरत येथील एका अन्य ज्येष्ठ साधू महाराजांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या साधू चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांचा वाहन चालक निलेश तेलगडे (३०) यांच्याकडे करोना काळात जिल्हा व राज्य ओलांडण्याचा आवश्यक परवाना नसल्याने त्यांच्या वाहनाला दादरा नगर हवेलीच्या प्रवेशद्वारावर रोखण्यात आले. पुन्हा जव्हार दिशेने परतत असताना त्यांना गडचिंचले येथील वन विभागाच्या चौकीवर रोखून ठेवण्यात आले. लहान मुलं चोरून नेणारी टोळी पकडल्याची अफवा गावांमध्ये पसरली व त्या ठिकाणी मोठा जमाव जमला. या जमावाने नंतर या तिघांना जबर मारहाण केली व त्यात त्यांचा मृत्यू झाला.
गडचिंचले आणि आसपासच्या ग्रामीण भागात ‘मुलं चोरणारी टोळी तसेच मूत्रपिंड काढण्यासाठी टोळी’ सक्रिय असल्याची अफवा करोना काळात पसरली होती. १६ एप्रिलच्या रात्री या टोळीबद्दलच्या अफवे संदर्भात प्रत्यक्ष साधू वेशात मंडळी दिसल्याने नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या.
वन विभागाच्या तपासणी नाक्याजवळ या तिघांची गाडी अडवली गेली. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असतानाही, अफवेमुळे तसेच अनेकांनी मद्यपान केलेल्या अवस्थेमध्ये असल्याने जमाव हिंसक होऊन तिघांनाही पोलिसांच्या समोरच बेदम मारहाण करत त्यांची निर्घृण हत्या केली.
