कासा : जव्हार तालुक्यातील मांजविरा गावाकडे जाणाऱ्या पुलाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सदर पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनलेला आहे. पूल दुरुस्तीच्या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र दुर्लक्ष करत आहेत.

श्रृंगारपाडा ते मांजविरा यांना जोडणाऱ्या मार्गावरील मांजविरा पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. पुलावरील संरक्षण कठडे तुटले आहेत. स्लॅब दबला आहे. दगड निखळले आहेत. बांधकाम ढासळले आहे. इतके होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे लक्ष नाही. पुलाच्या कडेला पूल धोकादायक असल्याचा फलकही लावण्यात आलेला नाही. परिणामी या पुलावरून वाहतुक सुरू आहे. परंतु पुलाच्या दुरवस्थेमुळे तसेच पर्यायी मार्ग नसल्याने नागरिक येथून जीव मुठीत घेऊन ये-जा करत आहेत. पुलाच्या कडेला झुडपे वाढली आहेत, त्यामुळे पूल येथे असल्याचा अंदाजच पटकन येत नाही. अपघातांची शक्यता वाढते.

पुलाजवळील गावात शाळा, शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे नागरिकांना येथे येणे क्रमप्राप्त आहे. तरीही सार्वजनिक बांधकामे विभाग आणि प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि तातडीने पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पुलाच्या दुरुस्तीविषयी आढावा घेतला जाईल. पुलाच्या कामास मंजुरी मिळाली आहे, लवकरच कामाला सुरुवात करणार आहोत.

– विजय बदाने, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार

मांजविरा पूल अतिशय धोक्याचा झाला आहे. त्यावरून मोठी वाहने जाऊ शकत नाहीत. लहान वाहने नेणेसुद्धा जिकिरीचे ठरत आहे. आम्ही पुलाच्या दुरुस्तीची अनेकदा मागणी केली होती. प्रशासनाने लवकरात लवकर हा पूल दुरुस्त करावा.

– अजय भसरा, ग्रामस्थ