लोकसत्ता वार्ताहर

कासा : आज संध्याकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून गुजरातला जात असलेल्या वाहिनीवर होंडा कंपनीच्या कारचा अपघात होऊन या अपघातामध्ये कारमधील दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. आज संध्याकाळी गुजरात कडे निघालेल्या होंडा जाझ कार चालकाला मेंढवन खिंडीसमोरील तीव्र वळण आणि उताराचा अंदाज न आल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी दुभाजकाला आदळून महामार्गावर उलटली. या अपघातामध्ये गाडीचा चुराडा झाला तसेच कारमधून प्रवास करणारे दोघे जखमी झाले.

मेंढवन खिंडीमध्ये तीव्र वळण आणि उतार असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत.आज संध्याकाळी या ठिकाणी अपघात झाल्यानंतर काही वेळातच महामार्ग पोलीस महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीचे कर्मचारी हजर झाले . अपघातग्रस्त कारमधून दोन्ही जखमींना बाहेर काढून कासा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. जखमी झालेल्या दोघांची ही प्रकृती स्थिर आहे.

आणखी वाचा-पालघरमधील ऊसतोड मजूर सुखरूप स्वगृही, मजुरांवर अत्याचारप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार उलटल्यानंतर पाठीमागे दुसरे वाहन नसल्यामुळे सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. अपघात झाल्यानंतर अर्धा तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती . महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साह्याने महामार्गावरून बाजूला केले त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मेंढवन खिंडीमध्ये अपघात होऊ नये म्हणून सूचना फलक, रस्त्यावर रंबलर बसवले आहेत. तरीसुद्धा वाहन चालक वेगाने वाहने चालवून या ठिकाणी अपघात होत आहेत.