कोटय़ावधी खर्च करूनही उद्यान बंद असल्याने नागरिकांची नाराजी

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत  डहाणूमधील चारोटी येथील आदर्श सांसद ग्राम योजना निसर्ग पर्यटन स्थळाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंदच असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. करोना काळात हे उद्यान नागरिकांसाठी बंद केले होते. परंतु आत निर्बंध शिथील होऊनही हे उद्यान खुले करण्यात आले नाही त्यामुळे नागरिकांसह बच्चे कंपनीचा हिरमोड झालेला आहे.  

वन विभागाने चारोटी येथे सन २०१६ ला  दीड एक जागेवर उद्यान विकसित करण्याचे काम हाती घेतले होते. २०१७-१८ मध्ये त्याचे काम पूर्ण झाले.  कासा वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेले हे उद्यान  आदर्श सांसद ग्राम योजनेंतर्गत  निसर्ग उद्यान म्हणून विकसित करण्यात आले आहे. त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे.

मुंबई -अहमदाबाद महामार्गावर डहाणू मधील चारोटी येथे   गुलजारी नदीच्या किनाऱ्यावर पूर्वस्थितीत असलेल्या बागेत  वन विभागाने  हे उद्यान  बांधले आहे. या साठी तब्बल एक कोटी ८० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.   या भागात असलेल्या पूर्वीच्या बागेचे सुशोभिकरण करू उद्यानाच्या चोहोबाजूला दगडी कुंपण करण्यात आले आहे. या उद्यानात मुलांसाठी खेळण्याची साहित्य, नागरिकांसाठी आसनव्यवस्था आदी सुविधा आहे. विविध झाडा-फुलांनी हे उद्यान बहरलेले आहे.

या उद्यानात विरंगुळासाठी नागरिक त्यांच्या कुटुंबियांसाठी येत असत. परंतु करोना काळात हे उद्यान बंद ठेवण्यात आले. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना आणि निर्बंध मोठय़ा प्रमाणात शिथील केले असतानाही हे उद्यान खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.  हे उद्यान लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.