पालघर: द्रुतगती मालवाहू मार्ग तसेच पश्चिम रेल्वेच्या चौपदरीकरणासाठी मोठय़ाप्रमाणात गौण खनिज वाहतूक केली जात असून अशा वाहतूकदारांच्या अरेरावीमुळे माकुणसार व परिसरातील स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी सफाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

माकुणसार येथील नागरिकांना वाहतुकीसाठी कपासे- केळवे रोड हा एकमेव मार्ग उपलब्ध असून रस्त्यावरून रेल्वे या प्रकल्पासाठी खासगी ठेकेदार अवजड वाहने क्षमतेपेक्षा अधिक माल भरून भरधाव वेगाने घेऊन जाताना दिसतात. याबाबत स्थानिकांनी अशा धोकादायक पद्धतीने होणाऱ्या वाहतुकीबाबत जाब विचारल्यास वाहन चालक अरेरावीपणे व उद्धटपणे उत्तर देऊन स्थानिकांना दमदाटी करतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच या वाहन चालकांकडे अनेक स्वामित्व धनाच्या पावत्या असल्याचे दिसून आले असून त्यांच्यामार्फत शासकीय नियमांचे उल्लंघन व फसवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे कपासे केळवे रोड रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून येथे राहणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अशा अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा काही अधिक प्रमाणात गौण खनिज वाहतूक केली जात असून त्याविरुद्ध पोलीस तसेच महसूल विभागाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी माकुणसार रहिवाशांनी तसेच पोलीस पाटील यांनी सफाळे पोलिसांकडे केली आहे.